पुणे / प्रतिनिधी :
‘युनिव्हर्सिटी-20’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-20’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारताच्या जी-20 अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅट्रिअना जॅक्सन, सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थितीत होते.
या परिषदेला 47 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेले महत्वाचे घटक यानिमित्ताने जागतिक स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र येतात. त्यासोबतच स्थानिक स्तरावर महाविद्यालयांशी निगडित बाबींवरही चर्चा होते. कोविड, आर्थिक आणि भुराजकीय समस्या, शिक्षणाची उपलब्धता आणि समान संधीची वाढती मागणी, ऑनलाईन शिक्षणाची तातडीची गरज, पर्यावरण बदल आणि तंत्रज्ञान विषयक समस्या हे आजचे वास्तव आहे. या बदलत्या शैक्षणिक वातावरणावर व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून होईल.
पुणे हे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा पुण्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत. पुण्यात 15 विद्यापीठे आणि 450 पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शहर असल्यामुळे मोठय़ा संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आजपर्यंत 6 लाखांहून अधिक विद्यार्थी देशातील सर्व राज्यांतून तसेच 85 वेगवेगळय़ा देशांतून येथे आलेले आहेत. यामुळेच शहरामध्ये लक्षणीय रोजगार निर्माण झालेला आहे. परिणामी पुण्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. विद्यापीठांच्या माध्यमातून बहुशाखीय आणि विद्यार्थ्याला सक्षम बनविणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.








