विदेशमंत्री जयशंकर यांची टिप्पणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीत आयोजित संयुक्त राष्ट्रसंघ सैन्य योगदान देणाऱ्या देशांच्या संमेलनात (युएनटीसीसी) भाग घेत यादरम्यान पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणांची मागणी केली. आजचा संयुक्त राष्ट्रसंघ देखील 1945 चा काळ दर्शवितो. संयुक्त राष्ट्रसंघाने विकसनशील देशांचा आवाज बुलंद करायला हवा आणि यावरच संयुक्त राष्ट्रसंघाची विश्वसनीयता टिकलेली असल्याची टिप्पणी जयशंकर यांनी केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ आजही 1945 च्या वास्तविकतांना प्रतिबिंबित करतो, परंतु 2025 ला नाही. 80 वर्षे एक मोठा काळ असून या काळादरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांची संख्या चौपट झाली आहे. दुसरीकडे ज्या संस्था बदल करण्यास अपयशी ठरल्या, त्या अप्रासंगिक ठरण्याचा धोका असतो असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाला प्रभावी करण्यासाठी त्यात सुधारणा घडवून आणाव्या लागतील, त्याला अधिक समावेशक, लोकशाहीवादी, सहभागी आणि आजच्या जगाचे प्रतिनिधी व्हावे लागेल. असे जयशंकर म्हणाले.
संयुक्त राष्ट्रसंघ शांतिसैन्यात आमचे शांतिसैनिक महत्त्वाचे ठरले आहेत. मानवीय मदत पोहोचविण्यासाठी हे शूर युवक-युवती स्वत:चा जीव जोखिमीत टाकतात, ते बहुपक्षवादाचे खरे मार्गदर्शक आहेत. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान केलेल्या 4000 हून अधिक शांतिसैनिकांचे मी आज स्मरण करू इच्छितो. ज्या देशांमध्ये शांतिसैन्य पाठविले जाते आणि ज्या देशांचे सैनिक या शांतिसैन्यात असतात, त्यांच्याशी शांति अभियानांवरून सल्लामसलत केली जावी असा सल्ला त्यांनी दिला.









