टाकळी गावात भानामतीचा प्रकार; तरुणाने अंधश्रद्धेला दिले आव्हान
मिरज : मिरज तालुक्यातील टाकळी येथे भानामतीचा प्रकार समोर आला आहे. गोल रिंगण आखलेल्या वर्तुळात लिंबू आणि भंडारा सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे सांगत ग्रामस्थांना भयमुक्त करण्यासाठी गावातीलच सम्राट पाटील या तरुणाने उताऱ्यातील लिंबूंचे सरबत करुन ग्रामस्थांसमोरच पिऊन दाखवले. या घटनेची गावात चर्चा होती.
टाकळी गावात गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ खडूने ग्रामस्थांना आखलेल्या गोलाकार रिंगण वर्तुळात खिळे मारलेले लिंबू व भंडारा उताऱ्यात तरुणाला सापडला. सदरचा प्रकार भानामतीचा असल्याची चर्चा गावभर पसरली. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही गावकरी भीतीही व्यक्त करीत होते.
मात्र, गावातील सम्राट पाटीलसह काही तरुणांनी पुढाकार घेत भीतीला आव्हान दिले. त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले लिंबू उचलून त्यांचा सरबत तयार केला आणि सर्वांसमोर पिऊन दाखवले. ही फक्त अंधश्रद्धा आहे, असे सांगत त्यांनी गावकऱ्यांना शांत केले. तरीही काही नागरिकांमध्ये या घटनेमुळे संभ्रम आणि कायम होते.
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रध्देला थारा दिला जात असल्याचे या घटनेवरुन दिसून येते. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन अंधश्रध्दा असल्याचे ग्रामस्थांना पटवून सांगितले. तरीही ग्रामस्थांमध्ये भीती होती. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात असा प्रकार करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.








