दोडामार्ग – वार्ताहर –
दोडामार्ग शहराला लागून असलेल्या खोलपेवाडी ( साळ, गोवा ) येथे एका दुचाकीने अचानक पेट घेण्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. सदर दुचाकीवर बसलेल्या रवी हरिश्चंद्र रेडकर ( रा. खोलपेवाडी – साळ ) याने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. हि घटना सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या खोलपेवाडी येथील घराकडून रवी रेडकर हा युवक आपल्या पल्सर एन. एस. या दुचाकीने दोडामार्ग बाजारपेठेकडे येत होता. खोलपेवाडी – दोडामार्ग च्या हद्दीवर श्री. रेडकर येऊन पोचला असता त्याला दुचाकीतून सायलन्सर मधून अचानक मोठा धूर येत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्याने तात्काळ दुचाकी थांबवली. दुचाकीला आग लागल्याचा अंदाज येताच काही क्षणात दुचाकीवरून बाजूला होत. श्री. रेडकर यांने पाण्यासाठी धावाधाव सुरू केली मात्र तोपर्यन्त आगीने दुचाकीला घेरले होते. यादरम्यान डिचोली येथील अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले होते. परंतु तोपर्यन्त दुचाकी जळून खाक झाली. सदर घटनास्थळी गोवा – दोडामार्ग पोलिसांनी रीतसर पंचनामा केला असून आगीत दुचाकी जळून सुमारे 95 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे रवी रेडकर यांनी सांगितले.









