अतिरिक्त पाण्याचा मार्कंडेय नदीत विसर्ग
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडण्यात आले आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढल्याने जलाशयाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्मयता असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील महिन्यात झालेल्या दहा दिवसांच्या पावसात राकसकोप जलाशय भरला होता. 2475 फूट पाणी भरल्याने जलाशयाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. पण त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले. मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून रविवारी दिवसभर आणि रात्रीदेखील पाऊस सुरू होता. त्यामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून 2476.4 फूट इतका पाणीसाठा आहे. जलाशय तुडुंब भरण्यासाठी एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. पण पावसाचा जोर वाढल्याने नदी व नाल्याचा पाणी प्रवाह वाढल्याने अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
रविवारी एक दरवाजा सहा इंचाने खुला करण्यात आला होता. पण पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी आणखी एक दरवाजा सहा इंचाने उघडण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयाच्या दोन दरवाजांद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याने सतर्क राहण्याचे आवाहन नदी काठावरील नागरिकांना करण्यात आले आहे.









