मार्कंडेय नदीकाठावरील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा : पाणीपातळी 2473.50 फुटावर
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर सोमवारी दिवसभर राहिल्याने जलाशय तुडुंब भरला आहे. जलाशयाला मिळणाऱ्या नदीपात्र व नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढल्याने शेवटची विस्तारलेली पाणीपातळीतही मोठी वाढ झाल्याने सोमवारी दुपारी पाणीपातळी 2473.20 फुटावर गेली. त्यामुळे जलाशयाच्या वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे तीन इंचाने उघडण्यात आले. त्यामुळे मार्कंडेय नदीपात्राला पूरमय परिस्थिती उद्भवणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पाण्याचा ओघ पाहून सोमवारी दुपारी 3 वाजता दोन दरवाजे दोन इंचाने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता पाण्याचा ओघ पाहून आणखी एक इंचाने दरवाजे उघडण्यात आले. रविवारच्या 2468.80 फूट पाणीपातळीत साडेतीन फूट पाण्याची वाढ होऊन सोमवारी सकाळी 2472.30 फुटावर गेली. तर दुपारी 2473.20 फुटापर्यंत पाणीपातळी झाली. सायंकाळी 6 वाजता पाणीपातळी 2473.50 फुटावर गेली आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची पाणीपातळी ही 2475 फूट असल्याने आता केवळ दीड फूट पाण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी पाणीपातळी पूर्ण होणार आहे. जलाशय परिसरात यंदा सर्वात जास्त 110.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 1101.6 मि.मी. पाऊस झाला आहे.
सतर्कतेचा इशारा
जलाशय पाणीपातळी ही 2475 फुटावरच नियंत्रित करावी लागणार असल्याने दीड फुटाचे पाणी सोमवारी रात्रीच भरणार आहे. मंगळवारी सकाळी पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा दरवाजे उघडावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मागील वर्षी 17 जुलै रोजी पाणीपातळी झाली होती पूर्ण
मागील वर्षी 17 जुलैला जलाशय तुडुंब झाले होते. यावर्षी 17 जुलै पासूनच पावसाने सुरुवात केल्याने आठवड्याभरातच जलाशय तुडुंब झाले आहे.
आठवड्यातच जलाशय तुडुंब
जलाशय स्थापनेपासून यावेळी प्रथमच जुलै महिन्याच्या निम्यापर्यंत कोरडा राहिला. जलाशयाची सर्वात खालची पाणीपातळी 2447 फूट बरेच दिवस राहिली. यामध्ये तीन फूट पाणी वाढ ही पंधरा दिवसांत झाली. तर त्यापुढील 23.5 फुटाची पाणीपातळी ही केवळ आठवड्यातच पूर्ण झाली. आतापर्यंत प्रथमच केवळ आठवड्यातच 567.7 मि.मी. पावसामुळे जलाशय तुडुंब झाला आहे. दरवर्षी 2000 ते 2800 मि. मी. पर्यंत पाऊस होणाऱ्या या परिसरात आतापर्यंत केवळ 1101.6 मी. मी. पाऊस झाला आहे. इतक्या कमी पावसातही सतत पाऊस झाल्याने जलाशय प्रथमच तुडुंब झाले आहे.









