हिंडलगा येथील सागर चंदगडकर याची ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात निवड
बेळगाव : हिंडलगा गावचा सुपूत्र सागर चंदगडकर याची कलर्स मराठी चॅनेलवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात निवड झाली आहे. या कार्यक्रमाच्या 6 व्या पर्वात टॉप 12 मध्ये तो निवडला गेला आहे. येत्या 7 व 8 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता हा संगीत कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे बेळगावचा सूर आता मराठी मनांवर राज्य करणार आहे. सागर शिवाजी चंदगडकर हा लक्ष्मी गल्ली, हिंडलगा येथील रहिवासी आहे. संगीतामध्ये कोणतेही शिक्षण न घेता तो यू-ट्यूब चॅनेलवरून गाणी शिकला. यापूर्वी कन्नड रिअॅलिटी शोमध्येही त्याने सहभाग घेतला आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या 6 व्या पर्वात तो आपले नशीब आजमावत आहे.
गायक अवधूत गुप्तेंकडून कौतुक
सागरने या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन दिली होती. त्यानंतर मुंबई येथे दुसरी व तिसरी ऑडिशन घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या फायनल ऑडिशनमध्ये त्याने कैलाश खेर यांचे ‘सैया’ हे सुफी गीत सादर केले. हे गीत अप्रतिम पद्धतीने सादर केल्याबद्दल गायक अवधूत गुप्ते व महेश काळे यांनी सागर चंदगडकरचे तोंडभरून कौतुक केले.
पोवाड्यांतून मिळाले बाळकडू…
सागरचे वडील शाहीर शिवाजी चंदगडकर यांनी सीमाभागासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोवाड्यांचे कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात सागर साहाय्यक गायकाची भूमिका निभावायचा. त्यातूनच गायनाची आवड निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास सुरू केला आहे.









