अमेरिका फर्स्ट म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे मनमानी करत आहेत ती त्यांना, अमेरिकेला आणि जगभरच्या लहान मोठ्या कोणत्याही देशाला शोभणारी नाही. त्यामध्ये कोणतीही विचारसंगत सुसूत्रता नाही. त्यामुळे अमेरिकेचे आणि ट्रम्पचे जगभर हसे होते आहे. भारतावर त्यांनी पंचवीस टक्के टेरिफ लागू केलेच होते. आता तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करता म्हणून टेरिफ आणखी पंचवीस टक्के वाढवून पन्नास टक्के केले आहे. रशिया, जीनलाही ते धमकावत आहेत. ट्रंम्प तात्या भलतेच चवताळले आहेत. कोणी म्हणतात त्यांना शांततेचे नोबेल हवे आहे. त्यासाठी सारा आकांडतांडव सुरु आहे.हातभट्टी चालकाला व्यसनमुक्ती मसीहा असा पुरस्कार कधी तरी मिळेल का? आणि मिळाला तर त्या पुरस्काराची कशात गणना होईल .तीच गत झाली आहे.अमेरिका हा जगाला झुंजवत ठेवून शस्त्रs विकणारा श्रीमंत देश आहे. त्या देशाच्या प्रमुखांने सर्वांना धमकावत, मनमानी करत टेरिफ अस्त्र असेही चालवावे आणि जगाने त्यास घाबरून साहेब आपण म्हणाल तसे… तूमच्यामुळे भारत-पाक संघर्ष संपला, तुमच्यामूळे
रशिया-युक्रेन लढाई थांबली म्हणावे. ट्रम्पचे कौतुक करत त्यांना शांततेचे नोबेल द्यावे असे म्हणावे. ते त्यांना मिळावे अशा मुर्ख कल्पनेत ट्रम्प वावरत असतील तर त्यांची कल्पना त्यांना लखलाभ होवो. जग ती मान्य करणार नाही. या मनमानीमुळे अमेरिका फर्स्टचा,
डॉलर चलनाचा आणि अमेरिकन वर्चस्वाचा फज्जा उडल्या शिवाय राहणार नाही. मोदींनी ट्रम्पचा पाठोपाठ चार वेळा आलेला फोन सुद्धा उचलला नाही. यातून ताणलेली स्थिती, मनस्थिती व रणनिती स्पष्ट होते आहे. अमेरिका फर्स्ट असे ट्रंम्पना वाटते तसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाटते. किंबहुना राष्ट्र प्रथम हाच त्यांचा आजवरच्या जीवनाचा सर्वोच्च बाणा आहे. पण इतराची रेषा पुसून, धमकावून, मोदी आपला हा बाणा सिद्ध करत नाहीत. आपली, भारत देशाची रेषा उंचावत त्यांनी राष्ट्र प्रथम हा बाणा जपला आहे. जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, जगभरातील अनेक देशांची मैत्री, सलोखा, संरक्षणसिद्धता, विविध क्षेत्रात गती प्रगती यामुळे तो बाणा अधोरेखित झाला आहे. तो अनेकांना खुपतो आहे. त्यातूनच प्रथम मोदीद्वेश आणि नंतर भारतद्वेश उफाळताना दिसत आहे. पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवताना मोदी आणि लष्कर कुठे कमी पडले नाही.ट्रम्प यांनी माझ्यामुळे युद्ध थांबले वगैरे कितीही बडवून घेतली तरी भारताने त्यास दुजोरा दिला नाही. ओघानेच शांततेचे नोबेल थोडे दूरावले. आता तर एका अमेरिकन सिनेट मेंबरने भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, अन्यथा भारत, चीन, रशिया यांना चिरडून टाकू असे वक्तव्य केले आहे. भारत ही जगातील एक मोठी शक्ती आहे चिरडायला ते चिलट नव्हे इतकी समज नसलेल्या ट्रम्प तात्या आणि कंपनीला काय म्हणावे हे तर्काबाहेरचे आहे. अमेरिकेचा भारतावर आता 50 टक्के टॅरिफचा बोजा पडणार आहे अशा परिस्थितीत, नवीन टॅरिफच्या अंमलबजावणीमुळे अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50टक्क्यांपर्यंत वाढेल. ट्रम्प यांनी आधीच सर्व भारतीय आयातीवर 25 टक्के टॅरिफ लादला होता, जो 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. त्याचवेळी, रशिया आणि युक्रेनमधील शांतता कराराचे प्रयत्न थांबत असताना व्हाईट हाऊस टॅरिफ आणखी वाढवण्याची योजना आखत असल्याचे हे नवे संकेत आहेत. युक्रेन युद्धावर कोणताही निर्णय न झाल्यास रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या चर्चेत प्रगती झाली नाही तर येत्या आठवड्यात ‘खूप गंभीर परिणाम‘ भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. पण, चीनसह रशियन तेलाचा इतर प्रमुख खरेदीदारांवर अमेरिकेने असेच उपाय लादलेले नाहीत. तर काही भारतीय कंपन्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील काही बड्या कंपन्या ट्रम्प धोरणाला दुर्लक्षित करुन भारतात मोठी गुंतवणूक करत आहेत. गुगलने तर मोठी गुंतवणूक केली आहे. इलान मस्कनी ट्रम्पना बाय बाय टाटा म्हणत भारतात गुंतवणूक व व्यापार सुरू केला आहे. भारताने व्यापारा संदर्भात पक्के धोरण ठरवलेले दिसते. त्यातच रशियाने तेल दरात पाच टक्के सवलत देवू केली आहे. अमेरिकेने कितीही आगपाखड केली तरी भारत आणि पंतप्रधान मोदींनी मौन पाळले आहे. या मौनात मोठा अर्थ व शक्ती आहे. भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत चर्चेच्या चार पाच फेऱ्या झाल्या पण भारत कोणताही दबाव वा देशहित, शेतकरी हित डावलून चर्चा करायला तयार नाही. म्हणून हा करार झालेला नाही. भारताची स्वत:ची बाजारपेठ मोठी आहे. मोदींनी स्वदेशीची हाक दिली आहे. जोडीला नवरात्रीपासून जीएसटी धोरण बदलणार असे लालकिल्ल्यावरून संकेत देत मंत्रिगटाची स्थापना त्यांनी केली आहे. आपल्याकडे दसऱ्याला नवी मोहीम सुरु करण्याची प्रथा परंपरा आहे. देशात दसरा-दिवाळीला सुखद धक्का देणार यांचे सुतोवाच मोदींनी केले आहे. स्वदेशी आणि जीडीपी टॅक्स, स्लॅब कमी करत बाजारात नवी फुंकर मारली जाणार आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार तर दोन अडीच टक्के परिणाम होणार आहे. तो भरुन काढून अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी भारताने धोरण निश्चित केलेले दिसते आहे. विदेशमंत्री जयशंकर यांनी अमेरिका वगळून जगातल्या लहान मोठ्या देशांची व्यापार करार करण्यासाठी यशस्वी पावले टाकली आहेत. यातून गाव करेल ते राव करत नाही हा धडा ट्रम्पंना मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. रशिया, भारत, चीन, वगैरे ब्रिक्स देश डॉलरला पर्यायी चलन निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. नवीन चलनांची निर्मिती
काही देशांचे गट एकत्र येऊन स्वत:चे नवीन चलन आणण्याचा विचार करत आहेत. तसे झाले तर अमेरिका आणखी अडचणीत येईल हे सांगायला ज्योतिषी नको. भारत कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही असे मोदींनी केवळ म्हटलेले नाही तर तसे दाखवून दिले आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरणला अणूचाचणी केली. म्हणून पाच शक्तिशाली देशांनी भारताची नाकेबंदी करत भारतावर आर्थिक बहिष्कार टाकला होता. बाजपेयींनी पाठोपाठ दुसरी चाचणी करत त्याला उत्तर दिले व शेवटी या पाचही देशांना आपला निर्णय बदलावा लागला, मागे घ्यावा लागला. यावेळीही तीच व तशीच वेळ अमेरिकेवर येईल. शांतीदूत म्हणून पाठ थोपटून घ्यायच्या प्रयत्नात ट्रम्पचे हसू होत आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्नच आहे. तूर्त ट्रम्प तात्यांचे चाळे रोज सुरु आहेत आणि भारताने या चाळ्यांवर औषध शोधले आहे.








