गोकाकमधील कुटुंबाचा आरोप
बेळगाव : देवगौडनहट्टी ता. गोकाक येथील सागर उद्दप्पा परसन्नावर यांचा 22 डिसेंबर 2023 रोजी अपघाती मृत्यू झाला. उसाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा मृत्यू झाला. महिना होत आला तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नसून संबंधित चालकावर कारवाई झाली नाही. याला पोलिसांचा नाकर्तेपणा जबाबदार असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बुद्ध-बसव, आंबेडकर इमारत आणि इतर बांधकाम मजूर युनियनतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. खनगाव येथून उसाने भरलेला ट्रक गुडनट्टी येथील मळ्यामध्ये जात होता. यावेळी सागर परसन्नावर यांना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु, वाहनचालकाने वाहन न थांबवता पळ काढला. यासंबंधीची फिर्याद सागरचे वडील उद्दप्पा यांनी गोकाक पोलीस स्थानकात दिली. परंतु, अद्याप याची कोणतीही चौकशी झालेली नाही. यामुळे मृत सागरच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.









