बाग-शेळवण, असोल्डा येथील व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू
प्रतिनिधी/ कुडचडे
बाग-शेळवण, असोल्डा येथील विनय मंगलदास देसाई (वय 43) ही व्यक्ती होळीच्या निमित्ताने गावातून वाहणाऱ्या जुवारी नदीच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत सहलीस गेल्यावेळी पोहताना बुडाली. सदर घटना शुक्रवारी घडली आणि मृतदेह शनिवारी सापडला, अशी माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. कुडचडे पोलीस स्थानकाला व अग्निशामक दलाला त्याची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला, पण विनयचा थांगपत्ता लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील त्याची मित्रमंडळी व नातेवाईकांनीही इतर ठिकाणी शोध घेतला. त्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली व शनिवारी सकाळी परत शोध मोहीम सुरू करण्यात आली असता मृतदेह सापडला.
पंचनामा निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योत बखले यांनी केला असून शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला जाईल, अशी माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली. मयत विनय देसाई हा सार्वजनिक बांधकाम खात्यात प्लंबर म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर आघात झालेला असून गावात शोककळा पसरली आहे.
मयत विनयचा शोध घेण्याच्या मोहिमेत कुडचडे अग्निशामक दलाचे धर्मेंद्र नाईक, प्रशांत सांगोडकर, विशाल वेळीप, सागर च्यारी, सत्यवान गावकर, अक्षय शेट देसाई, चालक-ऑपरेटर संकेत गाड देसाई, दशरथ झोरे यांनी सहभाग घेतला. या घटनेवर आमदार नीलेश काब्राल तसेच स्थानिक माजी पंच मनोज नाईक, दयानंद नाईक, ओंकार वस्त यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.









