प्रतिनिधी/ बेळगाव
सहामाही परीक्षा संपल्या असून आता विद्यार्थ्यांना सहलीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शाळांमधून सहलींचे नियोजन केले जात आहे. परंतु नियोजन करताना परिवहन मंडळाचीच बस सक्तीची करण्यात आली आहे. खासगी वाहनांचे वाढते अपघात व त्यांचे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे शिक्षण विभागाकडून परिवहन मंडळाच्या बसलाच परवानगी दिली जात असल्याने शाळांमधून तशा पद्धतीने नियोजन होत आहे.
विद्यार्थ्यांना बाहेरच्या पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, तसेच अभ्यासातून विरंगुळा मिळावा, या दृष्टिकोनातून सहलींचे आयोजन करण्यात येते. प्राथमिक स्तरावर एक ते दोन दिवस तर माध्यमिक स्तरावर तीन ते चार दिवसांच्या सहलींचे आयोजन केले जाते. डिसेंबर महिन्यात वातावरणात उष्णता कमी असल्याने वाहतूक करणे सोयीचे ठरते. अनेक शाळा याच महिन्यात सहली काढतात.
गटशिक्षणाधिकारी अथवा शिक्षणाधिकारी देतात परवानगी
शाळांनी राज्यांतर्गत सहलींचे आयोजन केल्यास संबंधित विभागाचे गटशिक्षणाधिकारी परवानगी देतात. राज्याबाहेरील सहलींसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांची परवानगी लागते. सहलींना जाण्यापूर्वी केएसआरटीसीकडे अनामत रक्कम भरून सहलीच्या पंधरा दिवस आधी शिक्षणाधिकाऱयांकडे परवानगी मागावी लागते. शिक्षणाधिकाऱयांनी परवानगी दिल्यानंतरच सहलींचे नियोजन होते.
केएसआरटीसी बसची सक्ती
खासगी वाहनांचे अपघात होऊन अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणे तसेच वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसल्याचे वारंवार समोर येत असल्यामुळे शिक्षण विभागाकडून केएसआरटीसी बसची सक्ती केली जाते. केएसआरटीसीकडे अनामत रक्कम भरल्याचे पत्र असेल तरच शिक्षणाधिकारी सहलींना परवानगी देत आहेत. त्यामुळे शाळांना सहलींचे नियोजन करताना केएसआरटीसीच्या बसचा विचार करावा लागत आहे.









