सव्वालाखाच्या चार मोटारसायकली जप्त
बेळगाव : मोटारसायकली चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक करून त्यांच्याजवळून सव्वालाखाच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटाने बेळगाव येथील माळमारुती व मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. सुरेश रामप्पा इंचल (वय 19) रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल, हणमंत लक्काप्पा वंटी (वय 30) रा. ममदापूर, ता. गोकाक अशी त्यांची नावे असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सुरेश व हणमंत हे दोघे व्यवसायाने वाहनचालक आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर सी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी पंतमहाराजांच्या यात्रेवेळी अवधूतनगर येथे रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेली एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना तिघा जणांना अटक करून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.









