3 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
इलेक्ट्रिक दुकानातील तांब्याच्या वायर्स चोरणाऱ्या एका त्रिकुटाला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून 3 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. यरगट्टी येथील दोन इलेक्ट्रिक दुकानात चोरी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना शकील हुसेनसाब सय्यद (वय 21) रा. यरगट्टी याच्यासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याजवळून चोरीसाठी वापरण्यात आलेली एक ॲपे गुड्स रिक्षा, हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, आणखी एक मोटारसायकल व त्या त्रिकुटाने इलेक्ट्रिक दुकानातून चोरलेले 10 बंडल वायर, जळालेल्या मोटारमधून काढलेली भंगार वायंडिंग वायर असा एकूण 3 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती, उपनिरीक्षक एस. एम. कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटाने यरगट्टी परिसरात तीन ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे.









