अमृत सरोवर परिसरात तालुका-ग्राम पंचायतीच्यावतीने जोरदार तयारी सुरू
बेळगाव : अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारने अमृत सरोवर योजना राबविली आहे. या माध्यमातून विविध तलावांचा विकास करण्यात आला आहे. याचबरोबर अनेक तलावांचे सुशोभिकरण करण्यात आले असून आता 15 ऑगस्ट रोजी बेळगाव तालुक्यातील 10 सरोवरांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. त्यामुळे तालुका पंचायत व ग्राम पंचायततर्फे संबंधित सरोवरांवर तयारी करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या अनुदानातून बेळगाव तालुक्यात 10 अमृत सरोवर निर्माण करण्यात आली आहेत. तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये स्वातंत्र्योत्सवाची तयारी करण्यात येत आहे. याच दरम्यान विशेष करून ज्या ग्राम पंचायतींमध्ये अमृत सरोवर निर्माण करण्यात आले आहेत. त्या परिसरातील स्वच्छताही करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. या सरोवरांवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविला जाणार आहे. तर बेळगाव तालुक्यातील 10 सरोवरांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात येत आहे बेळगाव तालुक्यातील सरोवरांवर कोणाच्या हस्ते ध्वज फडकविला जाणार याबाबत तालुका पंचायत व ग्राम पंचायतींनी प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील ग्राम पंचायतींना सूचना
बेळगाव तालुक्यातील 10 ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात 10 सरोवर निर्माण करण्यात आली आहेत. स्वातंत्र्योत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. सध्या ग्राम पंचायतींना आपण सूचना केल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सुरू आहेत.
– कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर
जिल्ह्यातील 140 अमृत तलावांवर तिरंगा फडकणार
सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विकासकामांची माहिती नागरिकांना मिळावी, याबरोबरच पाण्याचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हा पंचायतीकडून निर्माण करण्यात आलेल्या अमृत सरोवर योजनेतील तलावांवर राष्ट्रध्वज फडकवून 15 ऑगस्ट साजरा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 140 तलावांची निवड करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात अनेक विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये अमृत सरोवर योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या माध्यमातून गावांमध्ये पाणीसाठा करण्यासाठी तलाव निर्माण केले जात आहेत. या विकासकामांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने यंदा जिल्हा पंचायतकडून सदर अमृत सरोवर तलावांवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेतून अमृत सरोवर योजनेंतर्गत विविध गावांमध्ये 283 अमृत सरोवर तलाव निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये 140 तलावांचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित तलावांचे काम प्रगतिपथावर आहे.
काम पूर्ण झालेल्या अमृत तलावांवर ध्वज फडकविणार
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी अमृत सरोवर योजनेंतर्गत काम पूर्ण झालेल्या अमृत तलावांवर ध्वज फडकविण्याची सूचना ग्रा. पं. ना करण्यात आली आहे.
-हर्षल भोयर (जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी)









