लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापतींच्या उपस्थितीत ध्वजारोहण : आजपासून विशेष अधिवेशन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसदेत सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनापूर्वी रविवारी नव्या संसदेच्या वास्तूवर तिरंगा फडकवण्यात आला. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत नवीन संसदेच्या वास्तूवर तिरंगा फडकवण्यात आला.
सकाळी साडेनऊ वाजता नवीन संसदेवर तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, मंत्री पीयूष गोयल, अर्जुनराम मेघवाल, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित राहिले नाहीत. खर्गे यांनी यापूर्वीच राज्यसभेच्या सरचिटणीसांना पत्र लिहून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले होते. मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या हैदराबादमध्ये पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असल्यामुळे ते दिल्लीतील या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत.
मंगळवारपासून नव्या इमारतीत कामकाज
सोमवार, 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष सत्राच्या एक दिवस आधी तिरंगा फडकवण्याचा सोहळा संपन्न झाला. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान सरकारने विशेष अधिवेशन आमंत्रित केले आहे. या अधिवेशनाची सुरुवात सोमवारी जुन्या संसद भवनात झाल्यानंतर मंगळवारपासून पुढील कामकाज नवीन इमारतीत होणार आहे. नवीन संसदेत होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्यात करण्यात आले होते. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी रविवारी दुपारी साडेचार वाजता सर्वपक्षीय बैठकही पार पडली. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा होणार आहे. यावेळी संविधान सभेपासून आजपर्यंतच्या संसदीय प्रवासावर चर्चा होणार आहे. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात चार विधेयकेही मांडली जाणार आहेत. नव्या संसद इमारतीत विविध विभागांचे कर्मचारीही नव्या गणवेशात दिसणार आहेत.
नव्या संसद भवनात मंत्र्यांना दालनांचे वाटप
नवीन संसद इमारतीत केंद्रीय मंत्र्यांना विविध दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीची यादी देखील जारी करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात 11 ज्येष्ठ पॅबिनेट मंत्र्यांना तळमजल्यावर कार्यालये देण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परिवहनमंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, आदिवासी व्यवहारमंत्री अर्जुन मुंडा, वस्त्राsद्योग मंत्री स्मृती इराणी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची कार्यालये तळमजल्यावर आहेत. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, विरेंद्र कुमार, गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, पशुपती कुमार पारस, गजेंद्रसिंह शेखावत, किरेन रिजिजू, आर. के. सिंग आदींची कार्यालये पहिल्या मजल्यावर आहेत.









