काश्मीर खोऱ्यात बदलतेय स्थिती
वृत्तसंस्था /श्रीनगर
स्वातंत्र्यदिनापूर्वी काश्मीरमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याचा बंधू स्वत:च्या घरावर तिरंगा फडकविताना दिसून येत आहे. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी जावेद मट्टूचा बंधू रईस मट्टू यांनी स्वत:च्या घरावर तिरंगा फडकविला आहे. काश्मीर खोऱ्यातील 10 सर्वात वाँटेड दहशतवाद्यांमध्ये जावेद मट्टूचे नाव सामील आहे. जावेद हा दीर्घकाळापासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. स्वत:च्या मर्जीने मी तिरंगा फडकविला आहे. माझ्यावर कुणाचाच दबाव नव्हता असे रईस मट्टू यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा काश्मीर खोऱ्यात 14 ऑगस्ट रोजी कुठलाच बंद नव्हता. यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी पूर्ण बाजारपेठ बंद असायची. खोऱ्यातील राजकीय पक्ष केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी येथील जनतेला वेठीस धरत होते. माझा भाऊ 2009 मध्ये दहशतवादी झाला, त्यानंतर त्याच्याशी आमचा कधीच संपर्क झाला नाही. जर तो जिवंत असेल तर त्याने शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील व्हावे. येथील स्थिती आता बदलली आहे. पाकिस्तान काहीच करू शकत नाही. आम्ही भारतीय आहोत आणि कायम राहू असे रईस मट्टू यांनी म्हटले आहे. जावेद हा हिजबुल मुजाहिदीनचा सक्रीय दहशतवादी आहे. सध्या तो पाकिस्तानात आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात रविवारी बाइक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनगरचे पोलीस महानिरीक्षय अजय कुमार यादव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपसिथतीत ही तिरंगा रॅली पार पडली आहे. या रॅलीदरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरम् अशा घोषणा उपस्थितांकडून देण्यात आल्या.









