छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडी सुरक्षा दलांच्या ताब्यात
वृत्तसंस्था/रायपूर
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेला नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जाणारा करेगुट्टा टेकडी आता सुरक्षा दलांच्या ताब्यात आहे. अलिकडेच एका मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांनी हा परिसर नक्षलवाद्यांपासून मुक्त करत तो आपल्या ताब्यात घेतला. सुरक्षा दलांनी ताबा घेतल्यानंतर करेगुट्टा टेकडीच्या माथ्यावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला असून त्याचे चित्र समोर आले आहे. 21 एप्रिलपासून तेलंगणाच्या सीमेवरील विजापूर टेकड्यांमध्ये सुमारे 24,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते. याचदरम्यान बऱ्याच नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. शरणागती पत्करणाऱ्यांपैकी 14 जणांच्या डोक्यावर 28.50 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 11 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. यावर्षी आतापर्यंत बस्तर भागात 213 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी 203 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच 90 नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत.
बड्या नक्षलवादी नेत्यांचे आत्मसमर्पण
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन वरिष्ठ नक्षलवादी नेतेही सहभागी होते. भैरमगड एरिया कमिटीचे सदस्य सुद्रू हेमला उर्फ राजेश (33) आणि परतापूर एरिया कमिटीच्या सदस्या कमली मोदीयम या दोघांवरही प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय जैमोती पुनेम (24) यांना 3 लाख रुपये, शामनाथ कुंजम उर्फ मनीष (40), चैतू कुरसम उर्फ कल्लू (30), बुच्ची माडवी उर्फ रोशनी (25), सुखमती उर्सा (28) आणि सोमली हेमला (24) यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी संघटनेच्या विचारसरणीबद्दलचा भ्रमनिरास आणि अंतर्गत मतभेदांमुळे मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या नवीन पुनर्वसन धोरणाने देखील या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साहजिकच अनेक नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्यास प्रेरणा मिळाली आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत.









