प्रत्येक मुलगी माहेर सोडून सासरी जात असतेच पण माहेराबरोबर काहीतरी हरवल्याची जाणीव घेऊन जगत असते. अचानक कधीतरी रियुनियनचे निमित्त करून बाल मैत्रिणी भेटतात आणि हरवलेलं ते काहीतरी एकदम समोर येऊन ठाकतं. अशा ठिकाणी जो अनुभव येतो तो माहेरपणाचं सुख देऊन जाणारा असतो. खरंतर आईकडे माहेरपण करायची पद्धत, आई नेहमी माहेरपण करतेच पण एखादी मैत्रीण आईच्या मायेने हे माहेरपण करते तेव्हा नेमकं काय वाटतं हे शब्दात सांगता येत नाही. आपण खरंतर माहेरी गेल्यावर नेमकं काय करतो, हे मी आठवायला लागले आणि लक्षात आलं की माहेरी म्हणजे फुलपाखरासारखं भिरभिरायला लावणारे दिवस आपल्याला पुन्हा मिळतात. त्यासाठीच आपण खरं तर सतत वाट बघत असतो. माहेरी जाताना प्रत्येकाच्या आवडीचं काय न्यायचं, कुणाला भेटायचं, काय काय खायचं, याची यादी करण्यातच जाण्याआधीच महिना संपतो. ही यादी करतानाच आपण खरं म्हणजे मनाने केव्हाच माहेरी पोहचलेले असतो. माहेरी आपण राहतो किती…चार नाही तर आठ दिवस. पण हे सगळे क्षण आपल्याला वर्षभर पुरणारे ठरतात. खरंतर माहेरी गेल्यावर आपण आईजवळ किती वेळ बसतो? किती तिच्याशी बोलतो? याचा विचार केल्यावर लक्षात येतं खरं म्हणजे फारच कमी वेळ बसतो. त्याचं कारणही बहुतेक असेल,…आई आपल्याकडे बारकाईने बघते आणि तिच्या लक्षात येतं एकूणच आपलं सगळं जगण्याचं ताळतंत्र बदलले आहे, काही जणींचे खूप वजन वाढलेले असते, तर काहीजण खूप बारीक झालेल्या असतात. हे सगळं ओळखून ती जेव्हा सल्ला द्यायला लागते तो आपल्याला मुळीच नको असतो, म्हणूनच की काय आपण आईच्या नावावर इतर सगळय़ांना भेटत असतो आणि हिंडत असतो. आपल्या आवडीनिवडीचे पदार्थ काय काय करायचे यासाठी मात्र बाबांची एक वेगळीच लगबग सुरू असते. आईचा शब्द ते अगदी पटकन झेलत असतात आणि बाहेर त्या त्या गोष्टी आणायला धावत असतात. माहेरपण म्हणजे खरंतर नुसतं कौतुक, खाण्यापिण्याची रेलचेल, उशिरा उठण्याचा आनंद, अगदी ‘पाटावरून ताटावर’ हा शब्दप्रयोग तिथे अनुभवता येतो. आज रात्रीच्या जेवणाला काय? किंवा उद्या उरलेल्या पदार्थांचे काय? ह्या सगळय़ा प्रश्नांना एक तिथे विराम चिन्ह मिळालेलं असतं ते म्हणजे माहेरपण. आपलं लहानपण, आपल्या शाळेतल्या आठवणी, आपले शिक्षक, आपले शेजारी अगदी आपल्या मनातलं कोणीतरी भेटण्यासाठी आपण जात असतो. खरं म्हणजे माहेरी गेल्यानंतर आपण जुने अल्बम उघडून बसण्याचे ते क्षण असतात. आपण कसे बावळट होतो, कसे वागत होतो, कसे दंगा मस्ती करत होतो, या सगळय़ा गोष्टींची आठवण काढून मनमुराद एकटय़ानेच हसण्याची गंमत मिळणारं ठिकाण म्हणजे माहेर. या क्षणांमध्ये आपण फक्त आपलेच असतो. आपल्याला त्या ठिकाणी आपले नवरा, मुलं, बाळं किंवा इतर कोणीही नको असतं. असे क्षण हे फक्त माहेरीच मिळतात. या माहेरपणामध्ये फक्त मैत्रिणीच हवी असते किंवा आपल्या जवळचा मित्र हवा असतो. खरंतर आपण सगळेजण आपापले जगणं आपल्या परीने सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण या सगळय़ात आवर्जून आठवण येते ती आपल्या मित्राची, मैत्रिणीची किंवा सुर्हदाची, कारण आपल्या दोघीच्या मुठीत एक सारखं बालपण कुठेतरी घट्ट धरून ठेवलेलं असतं. अशा मैत्रीत वावरत असताना कोणतंही नातं किंवा नात्याचं लेबल आवश्यक नसतं, कोणतीही मोठेपणाची ओझी नसतात किंवा देण्याघेण्याचे उपचार नसतात. गरीब श्रीमंतीची तुलना नसते किंवा पुढे जाण्याची ओढ नसते, मागे राहण्याची धास्ती नसते, असते फक्त एक जिवंत उर्मी मायेची, हा मैत्रीचा ओलावा तसूभरही कमी झालेला नसतो. या सगळय़ाची गरज खरं म्हणजे आम्हाला पन्नाशीनंतर जास्त जाणवायला लागते. संसारातल्या जबाबदाऱया कर्तव्य संपल्यानंतर भौतिक जगाकडे जाणीवपूर्वक आम्ही पाठ फिरवल्यावर समोर सगळय़ात आधी काय येतं? तर आमची बालपणाची मैत्री. या मैत्रीमुळे माहेर भेटतं, की माहेरामुळे मैत्री ….. हा खरं म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. अशी मैत्री म्हणजे नेमकं काय असतं. ‘मैत्री म्हणजे जादूचं गाव पंख पसरून हुंदडण्याचं नाव’.
Previous Articleपाकिस्तानातील लोकशाहीची विटंबना
Next Article ‘अमृत’ चाटण…
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








