एस-400 क्षेपणास्त्राने 80 टक्के विमाने नष्ट : हवाई दलाकडून सराव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुसेनेने अलीकडेच आपल्या हवाई संरक्षण कवच म्हणजेच ‘सुदर्शन चक्र’ची यशस्वी चाचणी केली. शत्रूची राफेल, सुखोई आणि मिग लढाऊ विमाने या शस्त्रास्त्रांच्या दिशेने पाठवल्यानंतर सुदर्शन चक्र सक्रिय झाले. त्याने शत्रूच्या सर्व लक्ष्यांपैकी 80 टक्के विमानांचे अचूकपणे निरीक्षण करत ती नष्ट केली. या सरावाचा उद्देश एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या क्षमतेची चाचणी घेणे हा होता.
भारतीय हवाई दलाच्या ‘सुदर्शन चक्र’ म्हणजेच एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने युद्ध सरावात शत्रूची 80 टक्के लढाऊ विमाने पाडली. हवाई दलाच्या युद्ध सरावादरम्यान लष्कराच्या उर्वरित लढाऊ विमानांना माघार घ्यावी लागली आणि त्यांना मोहीम रद्द करावी लागली. हवाई दलाने थिएटर स्तरावरील युद्ध सराव आयोजित केला होता. या सरावात एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा एक स्क्वॉड्रन तैनात करण्यात आला होता. यावेळी हवाई दलाची राफेल, सुखोई आणि मिग लढाऊ विमाने शत्रूच्या रूपात उडाली.
रशियाकडून आयात करण्यात आलेल्या एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमध्ये 400 किलोमीटर अंतरावरून आपले लक्ष्य शोधून प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी याला ‘सुदर्शन चक्र’ असे नाव दिले आहे. ‘सुदर्शन चक्र’ हे भगवान श्रीकृष्णाचे प्रमुख शस्त्र आहे.
एस-400 प्रणाली एकावेळी 72 क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम
एस-400 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. हे हवेतून होणारे हल्ले टाळते. क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट लॉन्चर आणि शत्रू देशांच्या लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी ते प्रभावी आहे. हे रशियाच्या अल्माझ सेंट्रल डिझाईन ब्युरोने तयार केले असून जगातील सर्वात आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींमध्ये गणले जाते. एस-400 एकावेळी 72 क्षेपणास्त्रे डागू शकते. ही हवाई संरक्षण यंत्रणा ट्रकवर बसवलेली असल्याने ती कोणत्याही ठिकाणी हलवणे खूप सोपे आहे
रशियाशी 35 हजार कोटींचा करार
एस-400 च्या पाच स्क्वॉड्रनसाठी भारत आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये 35 हजार कोटी ऊपयांचा करार झाला आहे. यापैकी 3 स्क्वॉड्रन चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. आणखी 2 येणे बाकी आहे. रशिया-युव्रेन युद्धामुळे त्याला विलंब होत आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत ते हवाई दलाला दिले जातील, अशी अपेक्षा आहे. एस-400 देशाच्या सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरतील असा विश्वास लष्कराला आहे. युव्रेनविऊद्धच्या युद्धात रशियाने एस-400 क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.
भारतीय हवाई दलाला अलीकडेच स्वदेशी एमआर-एसएएम, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली तसेच इस्रायली स्पायडर क्विक रिअॅक्शन पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली प्राप्त झाली आहे. संरक्षण परिषदेने कुशा प्रकल्पांतर्गत लांब पल्ल्याच्या पृष्ठभागावरील हवाई क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीलाही नुकतीच मान्यता दिली आहे.









