योग्य जोडीदार न मिळणे मोठे कारण
चीनमध्ये महिलांना विवाहाशिवाय आई होण्याची कायदेशीर अनुमती नाही. यामुळे चिनी महिला अमेरिका आणि रशियात जाऊन आयव्हीएफच्या मदतीने मूल जन्माला घालत आहेत. चीनमधील चांगचुंग प्रांतात राहणारी ‘गेविन ये’ नावाची महिला याच कारणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. चिनी अॅप डॉयिनवर तिचे 73 लाख फॉलोअर्स आहेत.
गेविन आता 35 वर्षांची सिंगल मदर (एकल माता) आहे. सोशल मीडियावर स्वत:ची तसे मुलींची दिनचर्या ती शेअर करते. चीनमध्ये आता सिंगल मदर होण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. महिला आता कुटुंब नियोजनाशी निगडित निर्णयांवर अधिक नियंत्रण आणि मापदंडांची पुन्हा व्याख्या ठरविण्यात यावी यावर जोर देत आहेत. चीनच्या सोशल मीडियावर सिंगल मदर आणि आयव्हीएफ यासारखे विषय आणि महिला स्वातंत्र्याविषयी उघडपणे चर्चा होत आहे.

चीनमध्ये पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेला आदर्श मानले जाते. अशा स्थितीत काही लोक या नव्या ट्रेंडवरून दुविधेत आहेत. परंतु कमी होणाऱ्या लोकसंख्येमुळे चीन कमजोर पडत असल्याचे चित्र आहे. याचमुळे आता सरकार देखील नरमाईची भूमिका घेत आहे. पूर्वी सिंगल मदर झाल्यास अनेक शहर आणि प्रांतीय प्रशासनांकडून महिलांना शिक्षा करण्यात येत होती. तसेच त्यांच्यावर दंड ठोठावला जात होता.
मागील वर्षी 4 प्रांतांनी विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलांची नोंदणी करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रांत देखील याची तयारी करत आहेत. ऑल चाइना वुमन फेडरेशननुसार देशात 1.95 कोटी महिला सिंगल मदर आहेत. हा बदल त्यांना मोठा दिलासा देणारा आहे.









