भारत आणि विदेशातील संस्कृतीत मोठा फरक आहे. आपल्या देशात लोक सुटी मिळताच आरामासाठी स्वत:च्या घरी धाव घेतात. परंतु अनेक देशांमध्ये लोक सुटीकरता घरापासून लांब जाण्याचा पर्याय निवडतात. हा प्रकार प्रायव्हसी किंवा रोमांसासाठी केला जात नसून याचे कारण अत्यंत वेगळे आहे. चीनच्या काही प्रांतांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड दिसून येत आहे. तेथील युवा स्वत:च्या वीकेंड्सला आता घरांमध्ये राहण्याऐवजी अन्य कुठेतरी जात आहेत, याला ते गॅप डेजचे नाव देत आहेत. या कालावधीत हे युवा स्वत:च्या ओळखीच्या लोकांपासून लांब राहतात. अखेर घरापेक्षा अधिक आराम अन्य कुठे मिळतो असा विचार नक्कीच आपल्या मनात येऊ शकतो. परंतु चिनी युवांना घरात न मिळणारा आनंद हॉटेलमध्ये प्राप्त होत आहे. चीनचा हा ट्रेंड युवांमध्येच दिसून येत आहे. सुटीदरम्यान ते विशेषकरून हॉटेलची निवड करत आहेत.

हॉटेलमध्ये राहताना त्यांना त्यांची स्पेस मिळते, ज्यात त्यांना कुठलाही पार्टनर किंवा कुटुंबीयांची गरज भासत नाही. ते स्वत:च्या मनानुसार खात असतात, झोपतात किंवा आराम करतात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या शिस्तीचा बडगा नसतो. घरातील तणाव, आर्थिक दबाब, नातेसंबंध, पत्नीमुलांपासून दूर जात ते गॅप डे व्यतित करतात. हा प्रकार मुली अणि मुलांसाठी समान स्वरुपात आहे आणि अशाप्रकारे ते रिलॅक्स होऊन पुढील काळासाठी ताजेतवाने होत असतात. चीनमध्ये गॅप ईयरचा प्रकार जुना असून यात युवा सेकंडरीचे शिक्षण पूर्ण केल्यावर सुमारे एक वर्षापर्यंत विद्यापीठाचे शिक्षण घेण्यापूर्वी किंवा नंतर केवळ हिंडून जीवनाचा आनंद घेत असतात. पुढील आयुष्यात ताणतणावाला सामोरे जावे लागत असल्याने वर्षभराचा गॅप त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळवून देते. घरातील शिस्तीच्या वातावरणापासून मुक्त राहण्यासाठी हॉटेलमध्ये राहणे पसंत करत असल्याचे युवकांचे सांगणे आहे.









