कोल्हापूर / संतोष पाटील :
मागील काहीवर्षात दुचाकी–चारचाकीतील सवारी हा गरजेसह स्टेटस् सिम्बॉल बनला. परिणामी वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ राखणारी सायकल सवारी कालबाह्य झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला. मात्र मागील काही वर्षात साधारण कोरोना महामारीनंतर सायकल सवारीचा ट्रेन्ड वाढत आहे. व्यायामासह हौस म्हणून सायकलवरुन फिरण्याकडे कल वाढत आहे. हलक्या, सहज फिरवता येणाऱ्या गिअर आणि इलेक्ट्रिक सायकलीमुळे ही सवारी अधिकच आकर्षक बनत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दहा वर्षात शहरातील हवेत सल्फर डायऑक्साईड (एसओ–टू) ऑक्साईड नायट्रोजन (एनओएक्स) सारख्या विषारी घटकांची सहापटीने वाढ झाल्याचे आकडेवारी दर्शविते. नॅशनल कॉम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटीरिंग (एनएएक्यूएम)च्या अहवालानुसार शहरातील हवा अधिक घातक झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे गोंगाट वाढला. जगभरातील शहरात वाहनांमुळे हवेच्या प्रदूषणासोबत मानसिक आणि शारिरीक समस्यांचाही भर पडल्याची समस्या आहे. त्यास शाहू नगरी अपवाद नाही. बदलती जीवशैली व व्यायामाचा अभाव मानवी आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत आहेत. शहराचे सामाजिक स्वास्थाच्या जोडीला आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ करणारी सायकलीचा वापर वाढविणे हा यावर रामबाण उपाय आहे. नेदरलॅन्ड, इंग्लंड, जर्मनी, स्विडन, नॉर्वे, फिनलॅन्ड, जपान, स्विवत्झरलॅन्ड, बेल्जियम, चीन सारख्या प्रगत राष्ट्रांनी सायकल सवारीला प्राधान्य दिलं. कोल्हापूर महापालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरक्षित सायकलींगला प्रोत्साहन मिळाल्यास येथे मोठ्या संख्येने असलेला हौशी सायकलींग हा प्रकार दैनंदिन वापराचा भाग बनेल.
- कशासाठी सायकल
1880 मध्ये रॉयल मेल या ब्रिटिश माणसाने पहिली सायकल चालवण्यास सुरुवात केली. इतर खेळांसारखा हा हि एक खेळ प्रकार आहे, ज्यात जास्त कौशल्याची गरज नाही. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते. सायकलींवर मोटार वाहनांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत. सायकलिंगमुळे जीवाश्म इंधन, कमी हवा किंवा ध्वनी प्रदूषण कमी होते आणि रहदारीच्या जास्तीतजास्त घट कमी होते. 19 व्या शतकात सायकलींची सुरूवात झाली आणि आता जगभरात सुमारे 1 अब्जांची संख्या आहे. ते जगातील बऱ्याच भागांमध्ये वाहतुकीचे मुख्य साधन आहेत.
सायकल हा कमी खर्च, सोपा व्यायाम व कधीही व कुठेही चालवता येते. सर्व खेळाडूंसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. शरीराला दुखापत कमी होते. सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे. ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते. मांसपेशींना आकार प्राप्त होतो. शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजनावर नियंत्रण राहते. सायकल चालवण्याने वजन लवकर कमी होते. पचनक्रिया सुधारते, मासपेशींना आकार येतो. चरबीचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस सायकलिंग जरूर करावे. एका तासात 500 ते 800 उष्मांक सायकलिंग मुळे खर्च होतात.
- सायकल घ्यायचा विचार करताय ? जरुर घ्या !
अतिशय सुखकर, हलके, स्वस्त, विना कटकटीचे, विना प्रदुषणाचे, तब्येतीला चांगले असे वाहन. विशेषत ज्यांचे शाळा, कॉलेज, ऑफीस 5-10 किमीच्या परिघात आहे त्यांनी तर आवर्जून घ्यावे. हिच वेळ आहे सायकल संस्कृती पुनरज्जीवीत करण्याची. आपल्याकडे विनाकारण सायकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील लोकांचे वाहन म्हणून पाहिले जाते. त्यामुळे कित्येकदा शक्य असूनही केवळ प्रतिष्ठेच्या कारणासाठी अनेकजण धूर काढत जाणे पसंत करतात. मात्र, आता या मानसिकेत बदल होत आहे.
- सायकलींचा मोठा इतिहास
1885 मध्ये ब्रिटीश सैन्यात सायकलस्वारांच्या तीन तुकड्या होत्या. सायकलवरून छोट्या मोठ्या तोफा डागण्याचे काम होत असे. सैन्यात घोडा वापरायचा की सायकल, यावर बरेच मतभेद होते. घोडा आपल्या स्वाराला युद्धात वाचवू शकतो. तो स्वाराला थकू देत नाही, जे सायकलीमध्ये होते. परंतु सायकलला खायला–प्यायला देण्याचा खर्च नाही, तसेच तिची वाहतूक सोपी असायची, या कारणास्तव सायकलींचा सैन्यात वापर वाढला. पहिल्या महायुद्धाच्या काळात व्हॉलेंटियर रेजिमेंट म्हणून 3500 सायकलस्वार ब्रिटनमध्ये लष्करात होते. अमेरिका, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांतही सैन्याच्या मदतीला सायकलस्वारांच्या तुकड्या होत्या. सायकली 1903 मध्ये ज्या स्वरूपात बनवण्यात आल्या होत्या. त्या जवळजवळ 100 वर्षे तशाच राहिल्या. स्वित्झर्लंडमध्ये 1990 नंतरही सैन्यात सायकलस्वारांच्या तीन मोठ्या तुकड्या होत्या.
दर रविवारी किंवा सुट्टी दिवशी मी पन्नास किलोमीटर सायकल सवारी करतो. यामुळे आठवडाभर एकदम फ्रेश वाटते. इतरवेळी चालण्यासह इतर व्यायाम करतो. सायकलींग केल्याने मिळणारा आनंद काही औरच आहे.
सचिन पाटील (शासकीय अधिकारी)
सुरूवातील हौस म्हणून सुरू केलेली सायकलींग आता निकड बनली आहे. आमचा सायकलिंगचा ग्रुप प्रोफेशनल बनला आहे. रोज आणि सुट्टीच्या दिवशी ग्रुपने सायकलींग करतो. जिह्यातील विविध भागातील मोठा ट्रॅक करतो.
रामेश्वर थोरबोले (शिक्षक)
कामाचा ताण तणावातून मुक्तीसाठी व्यायाम गरजेचा आहे. अगर तो सायकलींग सारखा असेल तर त्याला तोड नाही. रोज 20 ते 30 किलोमीटर सायकलींग केल्याने शारिरीक आरोग्यसह मानसिक आरोग्य ठिक राहण्यास मदत होत असल्याचा अनुभव आहे.
सुहास पाटील (शासकीय कर्मचारी)








