एकेकाळी भारतात संयुक्त कुटुंब पद्धती सर्वत्र दिसून येत होती. वाढत्या आधुनिकीकरणानंतर अन् शहरीकरणारनंतर ती वेगानं लयाला जाऊन विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित झालीय अन् त्यामुळं छोटी-छोटी कुटुंबं जळीस्थळी दिसून येऊ लागलीत…याचा परिपाक म्हणजे पूर्वी घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्याकडे संवादासाठी जशी पुरेशी मंडळी होती ती सोय आता राहिलेली नाहीये. तरुण मंडळी करिअर वा शिक्षणानिमित्त दूर जाऊन राहण्यास प्राधान्य देऊ लागली असून या पार्श्वभूमीवर वृद्धांवर पाळी येऊ लागलीय ती मोठ्या प्रमाणात ‘एकटेपणा’ला तोंड देण्याची. एकेकाळी पाश्चात्य जगतात दिसणारी ही गंभीर समस्या आता भारतातही झपाट्यानं पसरतेय…
एकटेपणा…इंग्रजी भाषेत सांगायचं झाल्यास ‘लोनलीनेस’…जीवनातील अक्षरश: एक अत्यंत धोकादायक स्थिती, अंदाज करणंही कठीण जावं असा टप्पा…ब्रिटन व जपान यांनी त्या ‘एकटेपणा’ला सांभाळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केलीय. तर अमेरिकेचे सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्थी यांच्या मतानुसार, महासत्तेच्या भूमीतील वयस्करांना या स्थितीनं अक्षरश: छळलंय, त्यांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजवलेत. मूर्थी सांगतात की, जीवनातील हे वळण दररोज 15 सिगरेट्स ओढण्याइतपत हानिकारक…विशेष म्हणजे भारतानं एकटेपणाला फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. परंतु विकसित राष्ट्रांनी मात्र त्याचं वर्णन सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचविणारा रोग असं केलंय…
विश्लेषकांच्या मते, भारतात एकटेपणा दिवसेंदिवस वाढत असून ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्याभोवती हा फास आवळत चाललाय…एका सर्वेक्षणानुसार, वर्षाला मुंबईतील सुमारे 86 टक्के वयस्करांनी म्हटलंय की, खुद्द कुटुंबातल्या व्यक्तींनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय, त्यांना एकटं पाडलंय…एकटेपणा उघडपणे कुणीही मान्य करत नसला, तरी माणूस जेव्हा नैराश्याच्या भोवऱ्यात सापडतो तेव्हा ती प्रक्रिया वाढत जाते…वैद्यकीय नियतकालिक ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायरोमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’नं 2022 सालच्या मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील 45 वर्षांची सीमा पार केलेले 20.5 टक्के नागरिक मध्यम स्वरुपाच्या एकटेपणाचे, तर 13.3 टक्के लोक तीव्र ‘लोनलीनेस’चे बळी ठरलेत…

शहरांत समस्या उग्र…
भारतातील एकटेपणाचं एक प्रमुख कारण व्यक्तींचं वाढलेलं आयुर्मान आणि त्यामुळं निर्माण झालेल्या विविध गंभीर समस्या…कित्येक मानसिक तज्ञांच्या मतानुसार, आपल्या देशातील शहरांमध्ये ‘लोनलीनेस’नं प्रचंड रूप धारण केलंय. लोकांनी लहान घरांमधून गगनचुंबी टॉवर्समध्ये स्थलांतर केल्यानंतर वर्चस्व मिळविलंय ते ‘सीसीटीव्ही’नं अन् दर्शन घडू लागलंय ते बंद दारांचं. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटू लागलाय अन् त्यांना त्यांचे शेजारी देखील ओळखत नाहीत अशी परिस्थिती दिसून येते. एखाद्याचा मृत्यू झाल्यास, तर परिस्थिती अत्यंत भयावह बनते…
‘आम्हाला 2020 सालच्या लॉकडाऊनच्या वेळी एका 78 वर्षीय वृद्धाचा फोन कॉल आला. त्याचं वास्तव्य 72 वर्षीय पत्नीसह होतं आणि त्यांना गरज होती ती किराणामालाची. आमच्या स्वयंसेवकांनी त्यांना हव्या असलेल्या वस्तूंचा पुरवठा केला. परंतु धक्का बसण्यासारखी बाब म्हणजे त्यांच्या आसपास तब्बल 192 घरं होती नि एका व्यक्तीनं सुद्धा पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची माणुसकी दाखविली नाही’, मुंबईतील बिगरसरकारी संस्था ‘हेल्पएज’चे प्रकाश बोरगावकर यांनी सांगितलेलं हे उदाहरण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देतं…
एकटेपणाला जबाबदार असलेली अन्य एक बाब म्हणजे शहरांतील ‘कॉर्पोरेट जॉब्स’…तिथं जास्त वेळ काम केल्यानंतर थकलेल्या व्यक्तीला घरात गरज असते ती विश्रांतीची, शांततेची आणि बंद केलेल्या दरवाजाची. अशा व्यक्ती कळत-नकळत जागतिकीकरणाच्या प्रचंड गतीच्या बळी ठरताहेत…

ज्येष्ठांपुरती मर्यादित नाहीत समस्या…
पाश्चिमात्य देशांत ‘लोनलीनेस’नं ज्येष्ठांपुरतं मर्यादित न राहता युवा पिढीतही प्रवेश मिळविलाय…डॉ. मूर्थी म्हणतात, ‘प्रत्येक दिवशी दोन तासांहून अधिक सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ‘लोनलीनेस’ 30 मिनिटांहून कमी उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत भरपूर प्रमाणात छळतो’…भारतात देखील हे चित्र दिसून येऊ लागलेलं असून 2012 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, काही नागरिकांनी स्वत:वरच लादलेला एकटेपणा शहरांत 17.3 टक्क्यांवर पोहोचला होता, तर ग्रामीण भागांतील त्याची टक्केवारी होती 9.5. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे 22 वर्षांच्या 60 टक्के तरुणांनी एकटेपणाला कवेत धरलं होतं…मागील 11 वर्षांत गलेलठ्ठ पगाराच्या हव्यासापायी होणारं स्थलांतर, एकटे राहण्याकडे कल नि ‘सोशल मीडिया’चा वापर यात झालेली प्रचंड वाढ पाहता आता हे प्रमाण किती उंच झेपावलेलं असेल त्याची कल्पनाच केलेली बरी !
एकटेपणा म्हणजे…
? एक भयानक स्थिती…त्यात व्यक्तीचे मित्र व कुटुंबातील मंडळीशी भावनिक संबंध तुटतात…
? त्यात क्षमता आहे ती शारीरिक व मानसिक आरोग्यावर जबर परिणाम करण्याची…
? सर्व वयोगटातील नागरिकांना छळण्याची त्यात ताकद असली, तरी संशोधक भर देताहेत ते ज्येष्ठ नागरिकांवर…
? एकटेपणा जन्म देतो ‘अँक्झायटी’, ‘भय’, ‘नैराश्य’ नि ‘स्वत:बद्दल वाटणारी लाज’ यांना…
? अनेक जण समाजात मिसळण्याचं काम योग्य पद्धतीनं करत असले, तरी त्यांनाही ‘लोनलीनेस’ हिसका दाखवतोच…
? कोरोनामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मित्रमडळींची संख्या कमी करावी लागलीय…
? अमेरिकेत जून, 2019 ते जून, 2020 दरम्यानच्या कालावधीत 16 टक्के वयस्क लोकांना ‘लोनलीनेस’ला तोंड द्यावं लागलंय…
डॉ. विवेक मूर्थी यांच्या मतानुसार…
? एखाद्या महारोगाप्रमाणं अमेरिकेत एकटेपणा पसरत चाललाय…
? लोनलीनेस’मुळं ‘कार्डिओव्हेस्क्युलर’ रोग, वेड लागणं, ‘स्ट्रोक’, नैराश्य, अचानक मृत्यू यांच्यात वृद्धी…
? अमेरिकेतील तब्बल 50 टक्के नागरिक एकटेपणासंबंधीच्या तक्रारी करतात…
भारतात 13 कोटींहून जास्त ज्येष्ठ…
? एका सर्वेक्षणानुसार, 2021 साली देशात जवळपास 13.8 कोटी वृद्ध लोक होते. जनगणनेप्रमाणं 2011 साली वृद्धांची संख्या 10.38 कोटींपेक्षा जास्त होती. ज्येष्ठांच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 8.6 टक्के असून तो 2050 पर्यंत 19 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जातेय…
? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आणि जनगणनेची आकडेवारी स्पष्टपणे दर्शविते की, भारतातील वृद्धांची लोकसंख्या एकंदर सर्वसामान्य लोकसंख्येच्या तुलनेत खूप वेगानं वाढतेय. किंबहुना, येत्या दशकभरात एकूण लोकसंख्या केवळ 8.4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असताना ज्येष्ठांची लोकसंख्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त फुगण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय…
तंत्रज्ञानाचा सोसही करतोय परिणाम…
? 65 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धांना तरुण पिढीसोबतच्या त्यांच्या वैयक्तिक संवादावर तरुणांच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबामुळं परिणाम झाल्याचं अन् त्यामुळं त्यांना एकटेपणा जास्त भेडसावू लागला असल्याचं वाटतं असं एका पाहणीतून समोर आलंय…
? गेल्या वर्षी सदर पाहणी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई, लखनौ, पाटणा, पुणे आणि अहमदाबाद अशा भारतातील 10 शहरांमध्ये करण्यात आली होती आणि त्याअंतर्गत 10 हजार नागरिकांची मतं आजमावण्यात आली…
? यापैकी 51 टक्के ज्येष्ठांनी सांधेदुखी आणि शरीरातील वेदना यासारख्या आरोग्य समस्यांना त्यांची हालचालींवर मर्यादा टाकण्यास प्रामुख्यानं जबाबदार धरलं…65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मुक्तपणे फिरण्यापासून रोखण्यासंदर्भात लघवीविषयक समस्या हा देखील एक मोठा घटक असल्याचं दिसून आलंय…
? अलीकडील अभ्यासांनी असं सूचवलंय की, सामाजिकदृष्ट्या एकटे राहिल्यानं ‘स्मृतिभ्रंशा’चा धोका वाढू शकतो. स्मृतिभ्रंशामुळं व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार प्रक्रिया, आकलनशक्ती आणि समाजात मिसळण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो…
भारतातील शहरांत काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचं सर्वेक्षण
शहरं टक्के
बेंगळूर 44.5
चेन्नई 33
कोलकाता 32.5
मुंबई 20.5
दिल्ली 17
हैदराबाद 12.5
(मुंबईतील 80 टक्के ज्येष्ठ नागरिकांजवळ कुठल्याही प्रकारचा ‘हेल्थ इन्श्युरन्स’ नाही)
वयस्क व्यक्तींच्या तक्रारी…
तक्रारीचं स्वरूप टक्के
लोकांनी अनादर करणं 58 टक्के
मारहाण 23 टक्के
शाब्दिक बोलणी 29 टक्के
आर्थिकदृष्ट्या लुबाडणं 19 टक्के
संकलन : राजू प्रभू









