राजस्थानमध्ये हाय-स्पीड टेस्टिंग ट्रॅकचे काम युद्धपातळीवर सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे देशातील हाय-स्पीड टेनच्या चाचणीसाठी हाय-स्पीड टेस्ट ट्रॅक विकसित केला जात आहे. या ट्रॅकवर ताशी 220 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. जयपूरपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या राजस्थानच्या जोघपूर विभागातील गुढा-थथाना मिठाडी दरम्यान रेल्वे हा 59 किमीचा चाचणी ट्रॅक तयार करत आहे.
येत्या काही वर्षांत या ट्रॅकवर वंदे भारत एक्स्प्रेससह इतर हाय-स्पीड गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. हा चाचणी ट्रॅक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रोलिंग स्टॉकसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी सुविधा असणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार असल्याचा दावा रेल्वे विभागाकडून करण्यात आला आहे.
या हायस्पीड रेल्वेट्रॅकची मुख्य लाईन 23 किमी लांबीची आहे. गुढा येथे 13 किमीचा हाय-स्पीड लूप आणि नवा येथे 3 किमीचा क्वीक-टेस्ट लूप असेल. तसेच, मिथ्रीमध्ये 20 किमी लांबीचा कर्व्ह टेस्टिंग लूप तयार केला जाणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वे झोनच्या सीपीआरओनुसार, पहिल्या टप्प्यातील हायस्पीड टेस्ट ट्रॅकचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल. प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या प्रकल्पाचा दुसरा टप्पा डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचे उत्तर पश्चिम रेल्वे झोनमधील पॅप्टन शशी किरण यांनी सांगितले. सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी या आर्थिक वर्षातच या चाचणी ट्रॅकवर सुरू होईल, अशी भारतीय रेल्वेला आशा आहे.
सर्व सुरक्षा मापदंड तपासणार
हाय-स्पीड टेस्ट ट्रॅकद्वारे, टेनचे सर्व सुरक्षा पॅरामीटर्स 220 किमी प्रतितास वेगाने पाहिले जातील. यादरम्यान स्थिरता चाचणी, लवचिकता चाचणी, व्हील ऑफलोडिंग चाचणी, बोगी रोटेशनल रेझिस्टन्स टेस्ट आणि एक्स-पॅक्टर चाचणी यांचा समावेश आहे. तसेच, ट्रॅकमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट आणि सर्व प्रकारच्या सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येत आहेत.









