सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी एसटी महामंडळाकडे प्रवाशांची संख्या आता वाढू लागली आहे. एसटीला गावागावात मागणीही वाढती आहे. वेळेत एसटी बस धावावी यासाठी प्रवासी वर्ग आग्रही आहे. मात्र गणेश चतुर्थी पासून आतापर्यंत म्हणजे गेले 10ते 15 दिवस सावंतवाडी एसटी आगाराचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे. अनेक एसटी फेऱ्या १एक ते अर्धा तास उशिराने धावत आहेत त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळकरी व कॉलेज विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग यांच्यावर होत आहे. सध्या सावंतवाडी आगाराच्या जवळपास पाच ते सहा बसेस मुंबई येथे सोडण्यात आल्या आहेत. तसेच आरटीओ पासिंगसाठी बसेस गेले आहेत. त्यामुळे बस संख्या कमी झाल्याने गेले काही दिवस वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही गावातील व शहरापासून लगत असलेल्या काही गावातील बसेस अवेळीही सोडण्यात येत आहेत. एकंदरीतच एसटी आगराकडे प्रवाशांची वाढती संख्या आता दिसत येत असून गावागावात एसटी बसेस सोडाव्या यासाठी आगार विभागाकडे गावातून ग्रामस्थ व राजकीय पुढार्यांच्या मागणीची पत्रे येत आहेत. खाजगी वाहनांपेक्षा आता एसटी बसचा प्रवास बरा अशी धारणा आता प्रवाशांची होत आहे. त्यात महिला वर्गाला 50 टक्के सवलत आणि त्यात करून जेष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास, शाळकरी विद्यार्थ्यांनाही सवलत, त्यामुळे सवलतीचा फायदा प्रवासी वर्ग एसटीकडे घेताना दिसत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पुन्हा एकदा लाल परीला सुगीचा काळ आला आहे. सावंतवाडी एसटी आगाराचे आगार प्रमुख निलेश गाबित व स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांनी स्पष्ट केले. सध्या वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र आम्ही सकाळच्या वेळातील बसेस गावागावात वेळेत सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. सध्या एसटी बसेसला गावागावातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.









