ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या कामांचा परिणाम
बेळगाव : ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या रेल्वेमार्गांच्या कामांमुळे नैर्त्रुत्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक्स्प्रेस व विनाआरक्षित एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांना तासन्तास रेल्वेस्थानकावर वाट पहावी लागली. दीड ते दोन तास उशिराने काही एक्स्प्रेस दाखल झाल्याने प्रवाशांच्या नातेवाईकांचीही हेळसांड झाली. मिरज-हुबळी विनाआरक्षित एक्स्प्रेस दररोज सकाळी 9.30 वा. दाखल होते. परंतु मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास रेल्वे बेळगावमध्ये दाखल झाली. दोन तास उशीर झाल्याने बेळगावकडे येणाऱ्या प्रवाशांना कामावर जाण्यासाठी विलंब झाला. अशीच परिस्थिती हुबळी-मिरज या एक्स्प्रेसच्या परतीच्या वेळीही झाली. कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारी हरिप्रिया एक्स्प्रेस 20 मिनिटे, सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेस 46 मिनिटे, तिरूवेनवेल्ली-दादर चालुक्य एक्स्प्रेस 37 मिनिटे तर हजरत निजामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेस 3 तास 30 मि. उशिराने दाखल झाली. सर्वत्रच रेल्वेमार्गांच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वे वेळेत पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.









