उपहार सिनेमा दुर्घटनेवर आधारित सीरिज
अभय देओलची वेबसीरिज ‘ट्रायल बाय फायर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजची कहाणी 1997 मधील दिल्लीच्या उपहार सिनेमामधील आगीच्या दुर्घटनेवर आधारित आहे. या दुर्घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
ट्रायल बाय फायर सीरिजच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या शोदरम्यान भीषण आग लागल्याने उपहार सिनेमामध्ये शेकडो कुटुंबीयांनी कशाप्रकारे स्वतःचा स्वकीय गमावला होता हे दाखविण्यात आले आहे. या दुर्घटनेत नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांनीही स्वतःच्या दोन मुलांना गमाविले होते. या दांपत्याने दोन दशकांहून अधिक काळापर्यंत न्यायासाठी लढा दिला होता. ही सीरिज उपहार सिनेमा अग्निकांडामागील कटाचाही पर्दाफाश करताना दिसून येणार आहे. प्रशासनाची चालढकल करण्याची भूमिका आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे पीडित कुटुंबांचे दुःख कशाप्रकारे अधिक वाढत राहिले हे या सीरिजमधून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
या सीरिजमध्ये अभय देओलसोबत अनुपम खेर, आशीष विद्यार्थी, राजेश तेलंग आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसून येईल. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांनी या घटनेबद्दल ‘ट्रायल बाय फायर’ हे पुस्तक लिहिले असून त्याच्यावरच ही सीरिज बेतलेली आहे. प्रशांत नायर आणि रणदीप झा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.









