वकिलाच्या भूमिकेत काजोल
काजोल स्वत:ची आगामी वेबसीरिज ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोखा’द्वारे स्वत:चे डिजिटल पदार्पण करणार आहे. या सीरिजचा ट्रेलर निर्मात्यांनी सोशल मीडियावर सादर केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा दिसून येत आहे. द ट्रायल ही सीरिज 14 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजमध्ये काजोल एका वकिलाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरच्या प्रारंभी अतिरिक्त न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. राजीव सेनगुप्ता यांची पत्नी नोयोनिका ही व्यक्तिरेखा काजोलने साकारली आहे. स्वत:च्या पतीला वाचविण्यासाठी वकील म्हणून कामावर परतणाऱ्या व्यक्तिरेखेत काजोल आहे. या सीरिजमध्ये जिशू सेनगुप्ता, शीबा चड्ढा, कुब्रा सैत, एली खान यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.
द ट्रायल ही सीरिज अमेरिकन कोर्ट रुम ड्रामा ‘द गुड वाइफ’चा हिंदी रिमेक आहे. सुपर्ण वर्मा यांच्याकडून ही सीरिज दिग्दर्शित करण्यात आली आहे. तर मूळ सीरिजमध्ये जुलियाना मार्गुलीजने मुख्य भूमिका साकारली होती. ही सीरिज 2009 साली प्रदर्शित झाली होती आणि याचे 7 सीझन आतापर्यंत आले आहेत.









