एस.एस. राजामौली यांचा तेलगू चित्रपट ‘छत्रपती’चा हिंदी रिमेक करण्यात आला असून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून हिंदी अभिनेता नव्हे तर दाक्षिणात्य अभिनेता श्रीनिवास बेलमकोंडा हिंदी बॉक्स ऑफिसवर पदार्पण करणार आहे.

‘छत्रपती’ हा चित्रपट 12 मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. पेन स्टुडिओजच्या या चित्रपटाचा ट्रेलर हाय-ऑक्टेन अॅक्शनदृश्यांनी भरलेला आहे. श्रीनिवास हा तेलगूमधील लोकप्रिय अभिनेता आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही.व्ही. विनायक यांनी केले आहे. तर नुसरत भरूचा या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. शरद केळकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कहाणी राजामौली यांचे वडिल विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती.
श्रीनिवाससोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता असे विधान नुसरतने केले आहे. 30 वर्षीय श्रीनिवास हा तेलगू निर्माते सुरेश बेलमकोंडा यांचा पुत्र आहे. 2014 मध्ये अल्लुडु सीनू या चित्रपटाद्वारे त्याने अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तेलगू चित्रपट ‘छत्रपती’ 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभाससोबत श्रिया सरनने यात मुख्य भूमिका साकारली होती.









