बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992 :द हर्षद मेहता स्टोरी’द्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. मेहता हे आता या सीरिजचा दुसरा सीझन घेऊन येणार आहेत. त्यांची ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. मेहता यांनी स्वत:च्या या सीरिजचा ट्रेलर जारी करत याच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. या सीरिजद्वारे स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची कहाणी दाखविली जाणार आहे. तेलगीने केलेल्या 30 हजार कोटी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती.

या धक्कादायक घटनेवर पत्रकार संजय सिंह यांनी लिहिलेले पुस्तक ‘रिपोर्टर की डायरी’वर ही सीरिज बेतलेली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता गगन देव रियार हा अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणार आहे. तेलगीने बनावट स्टॅम्पपेपरची छपाई करत देशाला मोठे आर्थिक नुकसान पोहोचविले होते. स्टॅम्प पेपरच्या छपाईसाठी त्याने 300 हून अधिक लोकांना कामावर ठेवले होते. ही सीरिज 1 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.









