वरुण धवन अन् जान्हवी कपूरचा चित्रपट
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट ‘बवाल’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून हा चित्रपट 21 जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धाचा वारंवार उल्लेख होतो, तसेच ट्रेलरमध्ये हिटलर अन् जर्मनीतील गॅस चेम्बरची दृश्यंही दिसून येतात. परंतु त्यांचा चित्रपटाच्या कहाणीशी असलेला संबंध ट्रेलरमधून फारसा स्पष्ट होत नाही. वरुण अन् जान्हवीने या चित्रपटात विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आहे. दोघेही युरोपमध्ये जात असल्याचे आणि तेथे त्यांना दुसऱ्या महायुद्धाशी निगडित घटनांची झलक दिसून येत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
चित्रपटाचे चित्रिकरण भारत तसेच युरोपमधील अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. चित्रपटातील वरुण-जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना निश्चित आवडणार असा दावा दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केला आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या अर्थ स्काय पिक्चर्सकडून संयुक्तपणे करण्यात आली आहे.









