मंत्री शशिकला जोल्ले यांचा जारकीहोळींना टोला, निपाणीत सतीश जारकीहोळींविरोधात निषेध मोर्चा
वार्ताहर/ निपाणी
आमदार सतीश जारकीहोळी यांनी मानव बंधूत्व वेदिकेच्या माध्यमातून निपाणीत सभा घेतली. या सभेला बाहेरून कार्यकर्ते आणले. हिंदू धर्माविषयी चुकीचे निषेधार्ह वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीचा संदेश दिला. हे करताना हे फक्त टेलर आहे, असेही सांगितले. आमदार सतीश जारकीहोळी तुम्ही ट्रेलर दाखवलात पण बाकी पिक्चर आमचे कार्यकर्तेच दाखवतील आणि तो पिक्चर सुपरहिटही होईल, असा टोला मंत्री शशिकला जोल्ले यांनी लगावला.
निपाणी म्युन्सिपल हायस्कूल मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांनी हिंदू धर्माचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला. याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी निपाणीत भाजपतर्फे निषेध मोर्चा काढून तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले बोलत होत्या. प्रारंभी छत्रपती संभाजी चौकात मानवी साखळी करून निषेध करण्यात आला. यानंतर सतीश जारकीहोळींचा निषेध करत व हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयघोष करत तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
मंत्री शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, हिंदू धर्म ही संस्कृती आहे, भारतीयांचा अभिमान आहे. असे असताना आक्षेपार्ह वक्तव्य करणे अपमानकारक आहे. याचा राज्य व केंद्रीय पातळीवरून निषेध केला जात आहे. सतीश जारकीहोळी तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका. हिंदू हा सर्वांना घेऊन जाणारा धर्म आहे. आपण जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असे सांगितले. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, नंदू कदम, ऍड. निलेश हत्ती यांनीही मनोगत व्यक्त करताना निषेध नोंदविला.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, शहर भाजप अध्यक्ष प्रणव मानवी, ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा प्रा. विभावरी खांडके, सरोजनी जमदाडे, हालशुगरचे संचालक किरण निकाडे, अमित रणदिवे, दिलीप चव्हाण, गणपती गाडीवड्डर, संतोष सांगावकर, सर्जेराव मगदूम, सागर चेंडके, सद्दाम नगारजी, लक्ष्मी मगदूम, सिद्धू नराटे, राजू कानडे, बबन हावलदार यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.









