प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या रस्त्यावर अवजड वाहने रुतण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवारी शेडेगाळीजवळील वनखात्याच्या अँटीकोचींग कॅम्पजवळ ट्रक आणि भाजी वाहतूक करणारा टेंपो रुतून बसल्याने दोन्ही बाजूने चार तास वाहतूक बंद होती. त्यामुळे बाजारासाठी येणाऱया लोकांची तारांबळ उडाली.
खानापूर-रामनगर रस्त्याचे काम सुरू झाल्याने ही वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे. हाही रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे रुमेवाडी फाटय़ावरून अनमोडपर्यंत जाणाऱया रस्त्यावरून गेल्या चार वर्षापासून अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे. यामुळे हा रस्ता खराब असून येथून वाहतूक करणे कष्टप्रद झाले आहे. या रस्त्याबाबत अनेकवेळा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी गावकऱयांनी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्ता वाहतुकीस योग्य करावा, या मागणीचे निवेदन नुकतेच दिले आहे. अन्यथा रास्तारोको करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र याचीही दखल संबंधित खात्याने घेतलेली नाही.









