कोल्हापूर/सौरभ मुजुमदार
नवरात्र सुरू होण्यापूर्वी आपण आपले देवघर, स्वयंपाकघर, सर्व घराची, वस्तूंची सर्व स्वच्छता आनंदाने करतो. त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरातही शारदीय नवरात्र उत्सव काळात देवीचे मुख्य गर्भगृह (चांदीच्या उंबऱ्याच्या आतील भाग) ज्यामध्ये न्हानीघर, शयनगृह तसेच लाकडी मेघडंबरी ज्यामध्ये दगडी चबुतर्यावर श्री करवीर निवासिनी साक्षात उभी आहे याचा समावेश होतो. या गर्भगृहाची देखील स्वच्छता केली जाते.
कित्येक वर्षांपूर्वी हे संपूर्ण गर्भगृह केवळ तेल तुपाच्या मशालीतच प्रकाशित होत असे स्वच्छतेसाठी नारळाच्या अथवा सुपारीच्या झाडांच्या केरसुण्या असायच्या. हे मुख्य गर्भगृह स्वच्छता करताना देवीच्या मूर्तीला इरलं पांघरले जाते. इरलं म्हणजे बांबूच्या वेतांनी विणलेले एक प्रकारचे छोटे कुंचीच्या आकाराचे बुट्टी वजा साधन. कोकणात भाताचे रोपण करताना मुसळधार पाऊस व व्रायापासून संरक्षणासाठी डोक्यावरून मागे पाठीवर घेतले जाते. आपण आपल्या घरातील छोट्या चिमुकल्याची जशी काळजी घेतो त्याच काळजीने जणू देवीच्या मूळ मूर्तीच्या संरक्षणार्थ हे इरलं आज पांघरले जाते. ही परंपरा कितपत जुनी आहे याची संदर्भ उपलब्ध नसले तरी समाजातील प्रत्येक घटकाला जगदंबेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणूनच करवीर छत्रपतींच्या घराण्याकडून ही परंपरा चालू केलेली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही. जेणेकरून बुरूड समाजाला देखील यामध्ये समाविष्ट करून घेता येईल असे अभ्यासकांचे मत आहे.
मोठमोठे राजघराणे, देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महनीय व्यक्ती, साधू संत यांच्याकडून जगदंबेला शेकडो वर्षांपासून दिलेले दुर्मिळ सुवर्णअलंकार ,हिरे मोती, पाचू, जडजवाहिर असे अमूल्य दागिने वर्षभरातील अलंकार पूजेमध्ये वापरले जातात. अशा अमूल्य रत्नांनी विभूषित जगदंबेची मूर्ती म्हणजे साक्षात अवर्णनीय वैभवच. परंतु आजच्या दिवशी केवळ इरलं ज्यावेळी देवीला पांघरला जातं ते इरलं देखील देवी तेवढ्याच भक्ती भावाने व आत्मीयतेने स्वीकारते.
इरलं म्हणजे बांबूच्या सालांनी विणलेली नैसर्गिक वस्तू असून यामध्ये देवीची मूर्ती सहज व सुलभरीत्या गाभारा स्वच्छतेदरम्यान सुरक्षित राहू शकते कदाचित यामुळेच हि इरलं पांघरण्याची परंपरा असावी असे देवी अभ्यासकांना वाटते.









