भव्य चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य पथके, वेशभूषा पाहण्यासाठी पारंपरिक मार्गावर,लोकांची प्रचंड गर्दी
मडगाव : लोकनृत्य पथकांचा पदन्यास, ‘विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ’ अशा लोकगीतांवर ठेका धरत रोमटामेळांचे शिस्तबद्ध संचलन, पौराणिक कथांवर आधारित आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे आकर्षक चित्ररथ यांनी सजलेल्या शिमगोत्सव मिरवणुकीने रविवारी मठग्राम नगरी दणाणून सोडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे राहून हजारो लोकांनी या मिरवणुकीतील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्ये व वेशभूषेचा आनंद घेतला. शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार दिगंबर कामत यांनी शिमगोत्सव मिरवणुकीचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व इतर नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही उपस्थिती लावून मिरवणुकीचा आनंद लुटला.
मुख्यमंत्री सावंत यांनी या मिरवणुकीत सहभागी झालेले मुलांचे पथक व मडगावातील महिलांचे रोमटामेळ पथक यांचे कौतुक केले. गेली सात वर्षे पर्यटन खात्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे शासकीय शिमगोत्सवाचे आयोजन केले जात आहे ते पाहता आम्ही संस्कृती विसरलेलो नसून पारंपरिक कला व संस्कृती या माध्यमातून पुढे नेली जात आहे. सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारे शिमगोत्सव, कार्निव्हल, दिंडीसारखे महोत्सव मडगाव शहरात सातत्याने होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यटन व खास करून सांस्कृतिक पर्यटनाला वाढवायचे असेल, तर गोवा स्वच्छ व हरित ठेवावा लागेल, असे सावंत पुढे म्हणाले. याशिवाय आमदार कामत व मंत्री खंवटे यांचीही भाषणे झाली.
सुवारीवादनासह शिमगोत्सव कार्यालयाकडून मिरवणूक काढून पिंपळकट्ट्यावरील देव श्री दामोदराचा आशीर्वाद घेऊन या शिमगोत्सव मिरवणुकीला सुऊवात करण्यात आली. मुलांसाठीच्या वेशभूषा विभागात पौराणिक वेशभूषा सादर करण्यात आल्या तसेच प्लास्टिक कचरा आणि कचऱ्याची विल्हेवाट या विषयावर सादरीकरण करण्यात आले. त्यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. याशिवाय मिरवणुकीत सहभागी झालेल्या वेशभूषा स्पर्धकांपैकी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची वेशभूषा, आरोग्य खात्याचा क्षयरोग निर्मूलनावरील चित्ररथ, समईनृत्य व कुणबी नृत्य, सख्याहरी-सावईवेरे यांनी सादर केलेले लोकनृत्य हेही लक्षवेधी ठरले. याशिवाय ‘हर हर हर महादेव’ असा जयघोष करत घोडेमोडणी पथकाने समृद्ध भारतीय इतिहास डोळ्यांसमोर आणून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
बाल व महिला रोमटामेळ पथके लक्षवेधी
या मिरवणुकीत 18 रोमटामेळ पथकांचा सहभाग राहून महारुद्र एकसंघ गोंय यांचे मुलांचे रोमटामेळ पथक हे खास आकर्षण ठरले. त्यात सुमारे 500 बालकलाकारांचा सहभाग राहिला. महिलांच्या रोमटामेळ पथकांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात मॉडेल मडगाव आणि कलाश्री महिला मंडळाच्या आणि साई स्त्राrशक्ती, संभाजीनगर या रोमटामेळ पथकांचा समावेश राहिला.
आमदार कामत यांच्याकडून महिला पथकाला खास बक्षीस
मॉडेल मडगाव आणि कलाश्री महिला मंडळाच्या पथकात 147 महिलांचा सहभाग राहून त्यांनी आपली कला उत्कृष्टपणे सादर केली. या पथकाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दीड लाख ऊपयांचे खास बक्षीस जाहीर केले. ते मंडळाच्या अध्यक्षा नमिता लवंदे यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते स्वीकारले.









