कुडाळ – वार्ताहर
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली ) आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा – मयुरपंख २०२३ मध्ये मुळदेच्या उद्यानविद्या महाविद्यालय संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले,तर दापोलीचा कृषी महाविद्यालय संघ उपविजेता ठरला. उत्साही आणि जल्लोषी वातावरणात स्पर्धेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ १८ वी मयुरपंख स्पर्धा कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात उत्साहात झाली. या विद्यापीठाच्या इतिहासात तीन वेळा या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणारे उद्यानविद्या महाविद्यालय एकमेव महाविद्यालय ठरले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये विविध २५ महाविद्यालयांच्या ५०० विद्यार्थ्यांनी विविध २२ स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. यात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंच, कला आदी स्पर्धांचा समावेश होता. स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ ( दापोली) चे कला व क्रीडा संचालक संचालक डॉ.विठ्ठल नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी नितीन वागळे, विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक प्रा. निलेश शिरसाट, वेतोबा फेम कलाकार निलेश गुरव, छोट्या बयोची मोठी कहाणी या टीवी मालिकेतील बालकलाकार रुची नेरूरकर, गायक व तबला वादक श्री.सिद्धेश कुंटे, गीतकार व कथा लेखक डॉ.प्रणय प्रभू व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.राजन खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उद्यानविद्या महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक तसेच संघ व्यवस्थापकांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.परेश पोटफोडे व आभार डॉ.संदीप गुरव यांनी मानले.