महाराष्ट्रात शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा रंगारंग होणार आहे. पंतप्रधान त्यास उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण कोण होणार हे गुलदस्त्यात आहे पण मुहूर्त ठरला आहे
महाराष्ट्रात फोडाफोडीचा घोडेबाजार तूर्त भरणार नाही.जनतेने कौल तरी तसा दिला आहे. जनतेने रोजचा तोच नारा, जातीवाद आणि धोका यांना अव्हेरून भाजप प्रणीत महायुतीला भक्कम बहुमत दिले आणि आता स्थिर, भक्कम, बहुमताचं सरकार सत्तेवर येणार, रोजचे किळसवाणे राजकारण संपणार अशी आशा बाळगली आहे.या सत्तासंघर्षात महायुती व महाआघाडी यांची सुत्रे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हालवत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आरक्षणाची मागणी करत महाआघाडीला पोषक भाषा व राजकारण करत होते. पण मतदारांना वास्तवाची जाणीव झाली व लोकसभा निवडणुकीचा डाव विधानसभा निवडणुकीत पवार आणि कंपनीला फायदेशीर झाला नाही.विधानसभेला महाआघाडीचा दाऊण पराभव झाला. मोठा भाऊ आम्हीच,आमचाच चेहरा आणि आमच्या पक्षाचाच मोहरा म्हणणारे सारे दाऊण पराभवाला सामोरे गेले.आता पराभवानंतर ईव्हीएमच्या नावे गळे काढून ते रडू लागले आहेत. बाबा आढाव आत्मक्लेश कऊ लागले आहेत. महाआघाडीची पराभूत झाल्याने ही अवस्था तर दुसरीकडे महायुतीतही सारे ऑलवेल दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जे संकेत मिळत आहेत. त्याचा तोच अर्थ आहे. महायुतीचे निवडणूक कॅप्टन एकनाथ शिंदेच राहतील पण नवा मुख्यमंत्री कोण हे मतमोजणीनंतरच ठरवले जाईल, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेने त्यागालाही तयार झाले पाहिजे असे भाजप नेते अमित शहा यांनी प्रचारादरम्यान म्हटले होते. यावेळी अभूतपूर्व निकाल लागला असे म्हटले जाते पण ते तितके खरे नाही. सन 2019 च्या निकालाची भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी बेरीज 200 प्लस होतीच शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाची साथ सोडली पुढे शिवसेनेचे दोन तुकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले. आणि राज्यात सहा तगडे पक्ष निर्माण झाल्याचे दिसले तरी तीन मोठे पक्ष एकत्र येवून महायुती झाली.व दोन पक्षांचे दोन छोटे तुकडे आणि कॉंग्रेस एकत्र येऊन महाआघाडी बनली त्यामुळे निकाल पहाता तो सन 2019 प्रमाणेच 200 प्लस आला आहे.भाजपचे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा थोडे कमी पडले आहे. निवडणुकीत फडणवीस यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांना व शिवसेना शिंदेगटाला आपले उमेदवार पुरवले हे पण लक्षात घेतले पाहिजे. निकाल लागून नऊ -दहा दिवस होत आले अजून शपथविधी नाही. मंत्रीमंडळ रचना पक्की नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर कऊन आपले नरे गाव गाठले आहे आणि पत्रकार परिषदेत मोदी, शहा यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळला आहे त्यामुळे शंका-कुशंका वाढल्या आहेत. आता 5 डिसेंबरला शपथविधी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार हे पक्के झाले आहे. भाजपाचा मुख्यमंत्री व मित्रपक्षांचे दोन उपमुख्यमंत्री हाच 1आधिक 2 फॉर्म्युला नक्की करण्यात आला आहे.भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस निश्चित होतील अशी सर्वांची अपेक्षा आहे पण विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे अशी नावे भाजपा गोटातून चर्चेत आहेत. भाजपा धक्कातंत्र अवलंबून फडणवीस व शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणार अशीही चर्चा आहे पण हे सारे झटपट होईल असे वाटत नाही. फडणवीस यांना मुख्यमंत्री व शिंदे यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास सारखे आवडीचे खाते, अजितदादांना उपमुख्यमंत्री व तगडे खाते द्यावे लागणार आहे. मंत्रीपदाचा 20 आणि दहा-दहा असा फॉर्म्युला ठरला असे सांगितले जाते. भाजप गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, कृषी आदी खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. तोंडावर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होईल. या अधिवेशनात प्रश्नोत्तरे नसतील त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारही दोन, तीन टप्प्यांत शक्य आहे. तत्पूर्वी मुंबईत आझाद मैदानावर धमाकेदार ‘मी परत आलो’ सोहळा अर्थात जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत शपथविधी समारंभ पार पडेल. मुख्यमंत्रीपद भोगलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नाहीत असेही म्हटले जाते पण इतिहासात अशा अनेक हस्ती आहेत. दरम्यान आघाडीचे नेते दाऊण पराभवानंतर शांत बसणार नाहीत.त्यांना विरोधी पक्ष नेतेपदही मिळणे कठीण झाले असले तरी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएम दंगा सुरू केला आहे. बाबा आढाव त्यांना साथ देत आहेत. जरांगेही शांत नाहीत आणि शहा, मोदी यांचे महाराष्ट्रात अंतिम ध्येय शतप्रतिशत भाजप हेच आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्ष फुटले तर आश्चर्य नको.शरद पवार भाजप सोडून इतर पाच जणांनी एकत्र यावे असा प्रयत्न करणार आहेत, पण ते सोपे नाही डब्बल इंजिन गाडी सोडून कोण त्यात सहभागी होणार हा प्रश्न आहे.पाच वर्षे सत्तेशिवाय कसे राहायचे, पक्ष कसा टिकवायचा हा आघाडीतील घटक पक्षापुढे मोठा यक्षप्रश्न आहे. तूर्त एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 20 आणि दहा-दहा मंत्री हाच फॉर्म्युला पक्का होईल असे दिसते. राजकारणात विश्वासार्हता आणि वैचारिक बांधिलकी हवी ती हरवली तर मतदार धडा शिकवतात हे निकालाने स्पष्ट केले आहे. याचा योग्य बोध सारे घेतील आणि सत्ताकारणापेक्षा समाजकारणावर भर देतील तो दिवस महाराष्ट्राच्या भाग्याचा म्हणावा लागेल.तूर्त एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आणि पाच डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी पक्का झाला आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. सुमारे पंधरा हजार जणांना निमंत्रण पासेस दिले आहेत. कोण कोण कोणत्या खुर्चीत बसतो ही उत्सुकता सर्वांनाच शेवटपर्यंत राहणार आहे. तूर्त मुहूर्त ठरला आहे.








