संशयित जेम्स डिसोझासह अन्य दोघांना अटक : पिस्तोलच्या धाकाने शिवोली हादरली,काहीजण घटनास्थळावरून फरार,तिघां संशयितांना पकडण्यास हणजूण पोलिसांना यश
म्हापसा : दारूच्या नशेत शिवोली येथील एका रेस्टॉरंटमध्ये क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत दंगल माजवून हॉटेलातील कामगारांना पिस्तूलची धाक दाखवित हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी मंगळवारी रात्री जेम्स डिसोझा (वय 44, रा. धुळेर म्हापसा), महम्मद शाहीद (वय 29, करासवाडा-म्हापसा) व सुरज अनुपकुमार सिंग (वय 19 रा. करासवाडा-म्हापसा) या तिघांना अटक केली आहे. यादरम्यान त्याच्याबरोबर असलेले अन्य साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी संशयिताकडून पिस्तूल हस्तगत केले आहे. दरम्यान जेम्स यांनी गेल्यावर्षी म्हापसा फुकट गल्लीमध्ये सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अशीच गोळी झाडून दहशत माजवून पळ काढला होता. हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जेम्स याची सर्वत्र दहशत असून पिस्तूलाची धाक दाखवून तो इतरांना धाक दाखवित असतो. असे उघडकीस आले असून त्याच्याविरोधात यापूर्वी म्हापसा तसेच इतर पोलीस स्थानकात गुन्हे नोंद आहेत. दरम्यान याबाबत हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी घटनास्थळावरून जाताना वाटेत दंगामस्ती केली. वाटेत मिळणाऱ्या वाहन चालकांना त्यांनी धमकावण्याचा प्रयत्नही केला. संशयितांनी एकंदरीत मार्ना-म्हापसा रस्त्यावर दहशतीचे वातावरण निर्माण केले. पिस्तूल हातात घेऊन रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना पिस्तूलची धाक दाखवित धमकी देऊन जीवे मारण्याची धमकीही दिली.
म्हापशात माजविला होता दहशत
गेल्यावर्षी जून 2022 मध्ये संशयित जेम्स डिसोझा याने अशाच प्रकारे दारूच्या नशेत पिस्तूलातून गोळी झाडून सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान म्हापशात दहशत माजवली होती. त्यावेळी म्हापसा स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी त्याच्यासमवेत विलियम रॉड्रीग्स व विनायक सोमजी यांना अटक केली होती. या प्रकाराची वर्षभरानंतर संशयित जेम्स सोझा याने शिवोलीमध्ये पुनरावृत्ती केली. जेम्स हा 007 नावाने परिचित असून त्या नंबरची त्याची कारही जेम्स बॉण्ड 007 असे ते परिचित आहे. अलीकडे त्याची दंगामस्ती वाढली असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अन्य काही साथीदार फरार झाले असून हणजूण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. मंगळवारी मार्ना-शिवोली येथे या गोळीबाराच्या प्रकारावरून भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक प्रशल देसाई यांनी त्वरित कारवाई करीत संशयितास अटक केली.
पॅत्रोन रेस्टॉरंटमध्ये मध्य रात्री घटना
गोळी झाडण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये घडला. संशयित आरोपींचा चार-पाच जणांचा गट वरील रेस्टॉरंटमध्ये आला. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. संशयित रेस्टॉरंटच्या बार काऊंटरसमोर उभे राहिले. त्यामुळे रेस्टॉरंट चालक अक्षद शेट्यो यांनी त्यांना बाजूला राहण्याची सूचना केली. त्यावरून संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. तसेच शेट्टी यांच्या तोंडावर बुक्का मारला. हा प्रकार घडताच रेस्टॉरंटचे कामगार मालकाच्या मदतीला धावून आले. त्याबरोबर संशयित जेम्स डिसोझा याने त्याच्याकडील पिस्तूल काढले व यांच्यावर रोखले. पिस्तूल पाहताच एका कामगाराने पळ काढला असता, त्याच्या दिशेने संशयिताने पिस्तूलाची गोळी झाडली. सुदैवाने या गोळीच्या हल्ल्यातून तो कामगार बचावला. त्यानंतर संशयित आरोपी मालक व त्यांच्या कामगारांना धमकी देत तेथून निघून गेले.
पिस्तोल, कार जप्त
रेस्टॉरंट मालकाने या घटनेबाबत बुधवारी सकाळी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविऊद्ध भा.दं.सं.च्या 307 कलमांसह बंदूक कायदा व दंगल माजवण्यासह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला. तसेच जेम्स डिसोझा, महम्मद शाहीद व सुरज अनुपकुमार सिंग या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केली असून दोन कार ताब्यात घेतल्या आहेत. अशी माहीती निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिली. दरम्यान जेम्स याला उच्चदाब झाल्याने हणजूण पोलिसांनी त्याला रात्री उशीरा म्हापसा जिल्हा आझिलोत दाखल केले आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल देसाई, उपनिरीक्षक तेजस कुमार, आशिष परब, हवालदार योगेश कोरगावकर, शिपाई अभिषेक कासार, रामा परब, महेंद्र मांद्रेकर, सत्येंद्र नास्नोडकर, सुदेश केरकर, शुभम मयेकर यांनी संशयित आरोपींना पकडण्यास मोलाची कामगिरी केली. जेम्स डिसोझा व महम्मद याला मोरजी तर सुरज अनुकुमार सिंग याला थिवी रेल्वे स्टेशनवर पकडण्यास पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. रात्री उशीरा एक वाजेपर्यंत बार अॅण्ड रेस्टॉरंट खुले ठेवण्यास अबकारी खाते यांना कशी काय परवानगी देते अशी एकच चर्चा शिवोली गावात सुरू होती.









