पुणे / प्रतिनिधी :
Maharashtra Kesari 2022 महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : MPSC च्या प्राधान्य क्रमवारीच्या निकषांमध्ये बदल
मोहोळ म्हणाले, स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठय़ा शिखरावर पोहोचली. त्याच आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा, उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्विकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार आहे.
सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात जाणार आहेत. 33 जिह्यातील आणि 11 महापालिकामधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले.