हनुमाननगर-कुवेंपूनगर बुडाले काळोखात : बेळगावात ब्लॅकआऊटची प्रात्यक्षिके
बेळगाव : सायरन वाजला आणि काळजाचा ठोका चुकला. हनुमाननगर-कुवेंपूनगर येथील संपूर्ण परिसर अंधारात गुडूप झाला. पुढील पंधरा मिनिटे सर्वत्र काळोख आणि सगळीकडे वाजणारे सायरन अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली. युद्धजन्य परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा कशी काम करते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची कशी काळजी घेते? याचे प्रात्यक्षिक रविवारी रात्री बेळगावकरांनी अनुभवले. रात्री आठ वाजता हनुमाननगर मारुती मंदिर येथे ब्लॅकआऊट करण्यात आले. तब्बल पंधरा मिनिटे परिसरातील घरांसोबतच पथदीपावरील दिवे बंद करण्यात आले. या काळात स्थानिक नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना करण्यात आली होती. या काळात केवळ सायरनचा आवाज वाजत होता. पहिल्या तीन सायरनपर्यंत काही भागात उजेड होता. परंतु, पाचव्या सायरननंतर परिसरात पूर्ण काळोख झाला. काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरू होत्या. यासाठी पंजाब, राजस्थान या राज्यांमधील काही शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात येत होते.
या ब्लॅकआऊटची माहिती बेळगावच्या नागरिकांना व्हावी यासाठी हनुमाननगर, कुवेंपूनगर व सह्याद्रीनगरच्या काही भागात रविवारी रात्री ब्लॅकआऊट प्रात्यक्षिके करण्यात आली. ब्लॅकआऊट झाल्यानंतर केवळ माध्यमांचे कॅमेरे इतकेच सुरू होते. ब्लॅकआऊटची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेरे सर्व चित्र टिपत होते. हनुमाननगर सर्कलपासून हनुमान मंदिरापर्यंत ब्लॅकआऊट पाहण्यासाठी नागरिकांची तुरळक गर्दी होती. संपूर्ण परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगावच्या नागरिकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे ब्लॅकआऊट अनुभवला. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, कलादगी, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, नागरिकांना आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बचाव करावा, याची माहिती देण्यासाठी ब्लॅकआऊट प्रात्यक्षिक घेण्यात आले. महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच हेस्कॉमच्या सहकार्यातून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योग्यरित्या प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल त्यांनी सर्व विभागांचे कौतुक केले.









