फलकनुमा एक्स्प्रेसचे तीन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी : सुदैवाने जीवितहानी टळली
वृत्तसंस्था/ हैदराबाद
पश्चिम बंगालमधील हावडा येथून तेलंगणातील सिकंदराबादकडे जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना शुक्रवारी आग लागली. ‘बर्निंग ट्रेन’च्या या घटनेमुळे हैदराबादपासून 45 किमी अंतरावर असलेल्या बोम्मईपल्ली आणि पागिडीपल्ली रेल्वेस्थानकांदरम्यान एक्स्प्रेस थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आगीची माहिती मिळताच सर्व प्रवासी वेळेत रेल्वेमधून उतरल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृतपणे त्याची माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
तेलंगणामध्ये फलकनुमा एक्स्प्रेसच्या 3 डब्यांना आग लागली. सुरुवातीला एस-4 बोगीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच टेनमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बचावासाठी सर्वांनी रेल्वेमधून खाली उडी मारत स्वत:चे प्राण वाचवले. मात्र, काही प्रवाशांचे साहित्य डब्यात राहिल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एका डब्यात धूर दिसताच लोको पायलटने सतर्कता दाखवल्यानंतर बोम्मईपल्ली आणि पागिडीपल्ली दरम्यान टेन थांबवण्यात आली. आग इतर डब्यांमध्ये पसरू नये म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाधित डबे वेगळे केले. तीन डब्यांचे जवळपास पूर्ण नुकसान झाले असून दोन डब्यांचे अंशत: नुकसान झाले. मात्र, सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिह्यातील विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एस-4 कोचमधून आग इतरत्र फैलावल्याचे एका प्रवाशाने सांगितले.









