सुदैवाने सर्व 28 प्रवासी सुखरूप : वाहनाचे 20 लाखाचे नुकसान
संकेश्वर : भरधाव जाणाऱ्या खासगी आराम बसचा टायर फुटून लागलेल्या आगीत बस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजता शिंदेवाडी फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत प्रवाशांचे साहित्य व बसचे असे सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी, शर्मा ट्रॅव्हल्सची आराम बस (क्र. पीवाय 01 डीए 7676) ही बस मुंबईहून बेंगळूरकडे निघाली होती. दरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्यानजीक येताच बसचा टायर अचानक फुटला. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना वाहनातून खाली उतरण्याची सूचना केली.
त्यानुसार प्रवाशांनी सुरक्षित अंतरावर धाव घेतली. त्यानंतर शॉर्टसर्कीट झाल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत प्रवाशांनी सोबत घेतलेले पार्सल व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बसचे चालक सिद्धाप्पा दानाप्पा मुत्नाळे यांनी धावत्या बसमधून अचानक आवाज आल्याचे लक्षात येताच तात्काळ प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. क्षणात लागलेल्या आगीने अनेक प्रवासी धास्तावले. चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. बसमधील बहुतांशी प्रवासी हे साखरझोपेत होते. अशा परिस्थितीत झालेली घटना सर्वच प्रवाशांसाठी धोकादायक होती. घटना घडताच काहीवेळाने दुसरी बस बोलावून प्रवाशांना सुखरूप ठिकाणी पोहचविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर अग्निशमन दलाचे प्रमुख ए. आय. रुद्रगौडर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.









