रशियन सुरक्षा परिषदेचा इशारा
वृत्तसंस्था/ मॉस्को
पाश्चिमात्य देशांच्या धोकादायक धोरणांमुळे आण्विक, रासायनिक किंवा जैविक अस्त्रांच्या वापराची जोखीम वाढली आहे. अमेरिकेच्या विध्वंसक धोरणांमुळे जागतिक सुरक्षेचा स्तर सातत्याने खालावत असल्याचा दावा रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाइ पेत्रुशेव यांनी बुधवारी केला आहे.
युक्रेनने रशियाच्या तीन आण्विक ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मोल्दोवावर पाश्चिमात्य वसाहतवादाचा आणखी एक शिकार होण्याचा धोका घोगांवत आहे. मोल्दोवा स्वत:चे सार्वभौमत्व गमावण्याच्या मार्गावर असल्याचे पेत्रुशेव यांनी म्हटले आहे.
पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला पुरविली जाणारी शस्त्रास्त्रs तालिबानला विकली जात असल्याचा आरोप यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी केला होता. या आरोपाचा पेत्रुशेव यांनी पुनरुच्चार केला आहे. पेत्रुशेव हे पुतीन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.
पाश्चिमात्य देशांकडुन मिळालेल्या शस्त्रास्त्रांवर आमचे नियंत्रण असल्याचा दावा करत युक्रेनने रशियाचा आरोप फेटाळला आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांच्या वापराबद्दल खबरदारी बाळगण्याची सूचना केली आहे. युक्रेनला पाश्चिमात्य देशांनी आतापर्यंत 90 अब्ज डॉलर्सची सैन्य मदत केली आहे.









