रिझर्व्ह बँकेचा इशारा, रेपोदरासंबंधी भाकित नको
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महागाईवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्यातरी अर्धेच पूर्ण झाले आहे. हा प्रयत्न पुढच्या काळातही सुरू राहणार आहे. रेपो दर वाढविणे हा महागाई कमी करण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे भविष्यकाळात आम्ही रेपो दरासंबंधी कोणता निर्णय घेऊ याची अनुमाने आतापासून करू नयेत. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेणार आहोत, अशी स्पष्टोक्ती रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली आहे.
बुधवारी येथे मुद्रानिती समितीची (एमपीसी) बैठक झाली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली होती. या बैठकीचा वृत्तांत गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला होता. महागाई किंवा चलनवाढ कमी झाली आहे. तथापि, ती अपेक्षेइतकी कमी झालेली नाही. ती अद्यापही सुरक्षित प्रमाणाहून अधिकच आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचे व्यापक आणि पायाभूत आधार भक्कम होत आहेत. मात्र, आम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
4 टक्के दर सुरक्षित
महागाई किंवा चलनवाढ चार किंवा त्यापेक्षा कमी टक्के दराने होत असेल, तर ते प्रमाण सुरक्षित मानण्यात येते. या प्रमाणात एक किंवा दोन टक्के कमी अधिक अंतर पडले तरी ते चालू शकते. पण महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला तर मात्र, काही पावले तातडीने उचलावी लागतात. मे मध्ये महागाई दर चांगल्या प्रमाणात नियंत्रणात राहिला आहे. अशीच स्थिती आणखी 6 महिने राहिल्यास रेपो दराचा वेगळ्या भूमिकेतून विचार केला जाऊ शकतो. मात्र, तशी सुस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. म्हणून सध्या आम्ही रेपो दर आहे त्याच पातळीवर, म्हणजे 6.5 टक्के असा राखला असला तरी भविष्यकाळात काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. तसेच तर्क करुन नयेत, असा इशारा शक्तीकांत दास यांनी बोलताना दिला.









