सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. मात्र, याच संधीचा फायदा घेत नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने
व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल्स पाठवून बँक खात्यातील रक्कम हडप करण्याबरोबरच इतर प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या एपीके फाईल्सपासून सावध राहण्याची गरज आहे. सायबर क्राईम विभागाने सातत्याने जागृती करूनही एपीके फाईल्सच्या माध्यमातून सावजाच्या मोबाईलचा ताबा घेत त्याच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार काही थांबता थांबेनात. सायबर गुन्हेगार यासाठी वेगवेगळ्या संधीची प्रतीक्षा करीत असतात. आता 1 जानेवारी रोजी त्यांच्यासाठी आयती मोठी संधी चालून आली आहे.
31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होते. हीच संधी साधून व्हॉट्सअॅपसह इतर समाजमाध्यमांवर एपीके फाईल्स शेअर करण्याची शक्यता अधिक आहे. सायबर गुन्हेगारांकडून आलेल्या फाईल्सवर चुकून जरी क्लिक केले तरी तुमच्या मोबाईलचा ताबा त्यांच्याकडे जातो. अत्यंत सहजपणे सावजाच्या बँक खात्यात घुसून ते रक्कम हडप करू शकतात. अशा एपीके फाईल्सवर क्लिक करण्याआधीच त्या डिलिट करण्याची सूचना सायबर क्राईम विभागाने केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिननेही अशा धोकादायक एपीके फाईल्सवर लक्ष ठेवावे. दुर्लक्ष केल्यास कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम गायब होऊ शकते. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी नववर्षाचे स्वागत करताना धोकादायक एपीके फाईल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर क्राईम विभागाने केले आहे. मोठ्या प्रमाणात एपीके फाईल्स शेअर करण्याची शक्यता असून फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. जर फसवणुकीचा प्रकार घडल्यास 1930 या क्रमांकावर त्वरित तक्रार करण्याचे आवाहनही सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.









