संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची गर्जना : उत्तर प्रदेशात ब्राह्मोस क्षेपणास्त्र युनिटचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लखनौ
भारतीय लष्कराच्या ताकदीचा धोका पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचल्याची गर्जना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केली. भारताने पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांना एक कडक संदेश दिला आहे. भारतीय सैन्याने केवळ शौर्य आणि धाडस दाखवले नाही तर संयमही बाळगला आहे. आम्ही पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांना योग्य उत्तर दिले आहे, असेही संरक्षणमंत्री पुढे म्हणाले.
उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या अंतर्गत लखनौ येथे ब्राह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीच्या युनिटचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले होते. तसेच मुख्य कार्यक्रमस्थळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी बोलताना ‘आमच्या कारवाया फक्त सीमेजवळील लष्करी चौक्यांपुरत्या मर्यादित नव्हत्या. खरेतर, भारतीय सशस्त्र दलांचा प्रभाव रावळपिंडीमध्येही जाणवला, जिथे पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे,’ असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. लखनौमधील ब्राह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी युनिट हे उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. या केंद्राचे संरक्षणमंत्र्यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर हल्ला करून अनेक कुटुंबांचे सिंदूर पुसणाऱ्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांना शिक्षा दिली आहे. यासाठी आज संपूर्ण देश भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन करत आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि त्याच्या लष्करी सामर्थ्याच्या क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई करतो तेव्हा सीमेपलीकडील जमीनदेखील दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या पोषणकर्त्यांसाठी सुरक्षित राहणार नाही, असा संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जगभर पोहोचल्याचे ते पुढे म्हणाले.
नागरिकांना कधीही लक्ष्य केले नाही
भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. परंतु पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने धैर्य, शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून त्यांना योग्य उत्तर दिले आहे. आम्ही केवळ सीमेजवळ असलेल्या लष्करी तळांवर कारवाई केली नाही तर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत भारतीय लष्कराचा धोका जाणवला, असेही संरक्षणमंत्री पुढे म्हणाले.
ब्राह्मोस ही भारत-रशियाची संयुक्त निर्मिती
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशियाचे संयुक्त उपक्रम आहे. याचे उत्पादन आजपासून लखनौमध्ये सुरू झाले. लखनौमध्ये सुरू होणाऱ्या एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये एका वर्षात 80 ते 100 ब्राह्मोस क्षेपणास्त्रs तयार केली जातील. तसेच पुढील टप्प्यात 100 ते 150 क्षेपणास्त्रs बनवली जातील, अशी माहिती लखनौमधील या केंद्रातून देण्यात आली.
ब्राह्मोसची ताकद पाकिस्तान्यांना विचारा : योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान समर्थित दहशतवादावर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या लखनौ नोड येथे ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाला कुत्र्याचे शेपूट असे संबोधत ते कधीही सरळ होणार नाही, असे उपरोधिकपणे म्हटले. तसेच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची महती वर्णन करताना याची ताकद ‘पाकिस्तानला विचारा’ असेही त्यांनी खोचकपणे सांगितले. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चुणुक ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दिसून आली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनौ येथील ब्राह्मोस युनिटचे उद्घाटन केले. यादरम्यान, संरक्षण उत्पादनाशी संबंधित ‘ब्रह्मांड’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी ब्रह्मोस एरोस्पेसने निवडलेल्या तरुणांना नियुक्तीपत्रेही वाटली. मुख्यमंत्र्यांना ब्राह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृतीही भेट देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या शूर सैनिकांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे कौतुक केले.









