पोलीस आंध्रला रवाना
बेळगाव : खडेबाजार येथील कापड दुकानात कामगारांचे लक्ष विचलित करून किमती साड्या पळविणाऱ्या महिलांचे धागेदोरे हाती आले आहेत. त्या आंध्रप्रदेशमधील गुंटूरच्या असल्याची माहिती मिळाली असून या टोळीतील महिलांचा शोध घेण्यात येत आहे. शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.20 ते 1.35 यावेळेत सहा महिला व एक पुरुष अशा सात जणांनी खडेबाजार येथील विरुपाक्षी सिल्क अॅण्ड सारीजमध्ये घुसून 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या नऊ साड्या पळविल्या आहेत.. यासंबंधी त्याचदिवशी रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्या महिलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असून ही टोळी गुंटूर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांचे एक पथक आंध्रमध्ये त्यांचा शोध घेत आहे. एक-दोन दिवसांत या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्याचा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. देशपांडे गल्ली येथील शगुन ट्रेडर्स या सुका मेव्याच्या दुकानात कामगारांचे लक्ष विचलित करून 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 50 हजार रुपये पळविणाऱ्या इराणच्या दोन महिला व दोन पुरुष अशा चौघा जणांना अटक करण्यात आली होती. यापाठोपाठ आता आंध्रची टोळीही पोलिसांच्या टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.









