पद्मश्री पुरस्कारांसह सुवर्णपदकेही लंपास
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील हुगली येथे भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली. या चोरीत त्यांचा पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, सहा सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह विदेशी सन्मानही चोरट्यांनी लंपास केले. हिंदमोटर परिसरातील त्यांच्या वडिलोपार्जित घरात घडली असून, या घरात चौथ्यांदा चोरी झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी मागच्या दरवाजाचा कडीकुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि पुरस्कारांसह अनेक घरगुती वस्तू चोरीस नेल्या. विशेष म्हणजे, चोरट्यांनी बाथरूममधील बेसिनचे नळ देखील उपसून नेले आहेत. सध्या बुला चौधरी तिच्या कुटुंबासह कोलकाता येथे राहते. दरम्यान, बुला यांच्या घरी याआधीही तीन वेळा चोरी झालेली असून प्रत्येक वेळी पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही घटनांना आळा बसला नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी येथे एक पोलीस चौकी होती, मात्र तीही नंतर काढून टाकण्यात आली. त्यामुळे घर असुरक्षित झाले आहे. घटनेनंतर उत्तरपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमिताभ सन्याल यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या चोऱ्यांमुळे केवळ किमती पुरस्कार आणि पदकेच नाहीत, तर देशासाठी अभिमानाने खेळलेल्या खेळाडूच्या आयुष्यभराच्या आठवणी व परिश्रमांचे प्रतीक हरवले आहेत. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, संशयितांकडून चौकशी सुरू आहे.









