चार दिवस बाजार राहणार बंद : सेन्सेक्स 237 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात बुधवारी सेन्सेक्स व निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारात मिळता जुळता कल राहिल्याने विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स दिवसअखेर 237 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. बीएसई सेन्सेक्स 237.44 अंकांनी प्रभावीत होत निर्देशाक 58,338.93 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 54.65 अंकांनी घसरुन 17,475.65 वर बंद झाला आहे. आज गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व शुक्रवारी गुडफ्रायडे असल्यामुळे शेअर बाजाराला सुट्टी राहणार आहे. तसेच शनिवार व रविवार बाजार बंदच असतो. त्यामुळे थेट सोमवारी 18 रोजी बाजार सुरु होणार आहे.
या समभागांची घसरण
दिवसभरातील कामगिरीनंतर एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, डॉ.रेड्डीज लॅब, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला आयटीसी, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
चढउताराचे सत्र
बुधवारी शेअर बाजारात चढउताराचे सत्र राहिल्याचे दिसून आले. यामध्ये महागाई वाढणार असल्याची शक्यता व कच्च्या तेलाच्या वाढत जाणाऱया किमतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थितरतेचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात राहिले. तर चीनचा शांघाय कम्पोझिट नुकसानीत होता.









