वायव्य परिवहन विभागाचा उपक्रम : 141 बसस्थानकांमध्ये बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
बेळगाव : वायव्य परिवहन विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकांमध्ये 141 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रवाशांची विशेषत: महिला व मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. वायव्य परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, उत्तर कन्नड जिल्ह्यांसह 9 विभागीय मुख्यालये आहेत. याठिकाणांहून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती योजनेंतर्गत मोफत बसप्रवासाची मुभा दिली आहे. यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे महिला व मुलांची सुरक्षितता याबाबत परिवहन अधिकाऱ्यांसाठी मोठी चिंता बनली आहे. त्याचबरोबर बसस्थानकांमधून चोरीच्या घटनाही घडत आहेत.
यावर आळा घालण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीटीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. बसस्थानकांमध्ये खिसा कापणे, मोबाईल चोरी, सामान्यांची चुकीची नोंद करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच चोर व गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वायव्य परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्व सहा जिल्हे व नऊ विभागांमध्ये 141 ठिकाणी सुमारे एक हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हुबळी बसस्थानक हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे पहिले विभागीय बसस्थानक ठरले असून प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डेपोमध्येही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रवाशांना व सर्व विभागीय बसस्थानकांमध्ये गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रभारी आणि सुरक्षा अधिकारी सीसीटीव्हीचे निरीक्षण करणार आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा अनुचित घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून निदर्शनास आणण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा तर होणारच आहे. त्याचबरोबर अनुचित प्रकारांवरही चाप बसणार आहे. यापूर्वी काही बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र ते योग्यरित्या काम करीत नसल्याने सीसीटीव्ही म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती होती. मात्र आता जुने सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.









